बळसाणे :- केंद्र सरकारने खताच्या किमती कमी कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे शिंदखेडा तालुकाध्यक्ष नारायण गिरासे यांनी दोंडाईचा येथील नायब तहसीलदार अजय खैरनार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने खताच्या किमती कमी कराव्यात. १ जूनपर्यंत जर त्या कमी केल्या नाही, तर आंदोलन करणार. रासायनिक खतांच्या किमतींमध्ये अचानकपणे वाढ झाली. शेतकरी हा मातीत पैसा टाकून उत्पन्न काढतो आहे. त्याने उत्पादित केलेल्या मालाला भाव मिळत नाही. विविध संकटांमुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे आणि त्यातच केंद्र सरकारने खताच्या एका गोणीमागे पाचशे ते सहाशे रुपये भाववाढ केल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये जास्त भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खतांच्या किमती त्वरित कमी कराव्यात, अशी मागणी केली आहे.