शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित किंमत देण्याची मागणी;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:43 IST2021-09-09T04:43:34+5:302021-09-09T04:43:34+5:30
धुळे : शेतकऱ्यांच्या शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित लाभकारी मूल्य देण्यासाठी कायदा करावा, अशी मागणी करीत भारतीय किसान संघातर्फे बुधवारी ...

शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित किंमत देण्याची मागणी;
धुळे : शेतकऱ्यांच्या शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित लाभकारी मूल्य देण्यासाठी कायदा करावा, अशी मागणी करीत भारतीय किसान संघातर्फे बुधवारी देशव्यापी आंदोलन करण्यात आले. भारतीय किसान संघाच्या धुळे जिल्हा शाखेतर्फे धुळे शहरात क्युमाईन क्लब रस्त्यावर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, किसान संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महामंत्री यांनी ११ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत निवेदन दिले होते. बाजारात खरेदीच होत नसेल तर सरकार घोषित करीत असलेल्या आधारभूत रकमेस अर्थ नाही. शेतकऱ्यांना किमान आधारभूत रक्कम किंवा उत्पादन खर्चावर आधारित फायदेशीर किंमत द्यावी, एकदा घोषित केलेल्या फायदेशीर किमतीत वेळोवेळी महागाईनुसार समायोजन करून त्या प्रमाणात वितरण करावे, शेतकऱ्याचे उत्पादन बाजार समितीत, बाजार समितीच्या बाहेर किंवा सरकारने खरेदी केले तरी घोषित केलेल्या फायदेशीर किमतीवर विकले जाईल, घोषित किमतीपेक्षा कमी किमतीस व्यवहार झाल्यास तो अपराध मानण्यात येईल आदी मागण्यांची आणि नियमांची तरतूद असलेला कायदा करण्याची मागणी निवेदनात केली आहे. कठोर कायदा केला तरच या गोष्टी साध्य करणे शक्य असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामुळे उत्पादन खर्चावर आधारित फायदेशीर किमतीसाठी कायदा करावा; अन्यथा भारतीय किसान संघातर्फे प्रायव्हेट मेंबर बिलाच्या माध्यमातून संसदेत कायदा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असा इशाराही निवेदनात दिला होता. परंतु या निवेदनाला केंद्र सरकारने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे बुधवारी देशव्यापी आंदोलन झाले.
धुळे शहरात झालेल्या धरणे आंदोलनात किसान संघाचे जिल्हाध्यक्ष सयाजीराव बागुल, साहेबचंद जैन, दुर्लभ जाधव, उमेश चाैधरी, प्रभाकर चाैधरी, उत्तम तापडे, प्रशांत अहिरे, मधुकर वाघ, रामराव गवळे, सुहास खलाणे, ईश्वर माळी, रवींद्र जाधव, माेहन सूर्यवंशी, समाधान पाटील, वना माळी यांच्यासह काही शेतकरी सहभागी झाले होते.