निधी उशिरा मिळाल्याने गणवेश खरेदीला विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:34 IST2021-03-24T04:34:07+5:302021-03-24T04:34:07+5:30
गणवेश खरेदीत राजकारण नाही - मुख्याध्यापक संघटना धुळे - जिल्हा परिषद शाळेच्या विध्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून गणवेश दिला ...

निधी उशिरा मिळाल्याने गणवेश खरेदीला विलंब
गणवेश खरेदीत राजकारण नाही - मुख्याध्यापक संघटना
धुळे - जिल्हा परिषद शाळेच्या विध्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून गणवेश दिला जातो. गणवेश खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीचे असतात. बऱ्याचदा गणवेश खरेदीवरून शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांमध्ये राजकारण होते आणि विध्यार्थ्यांना गणवेश मिळण्यास उशीर होतो. मात्र जिल्ह्यात गणवेश खरेदीत राजकारण्यांची कोणतीही लुडबुड नसल्याचे मुख्याध्यापक संघाचे म्हणणे आहे. निधी उशिरा प्राप्त झाल्यामुळे गणवेश वाटपाला उशीर झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
प्रत्येकवर्षी जून महिन्यात गणवेश खरेदीसाठी निधी प्राप्त होतो. त्यानंतर शालेय व्यवस्थापन समितीची बैठक होऊन गणवेश खरेदी केली जाते व विध्यार्थ्यांना गणवेश वाटप केले जातात. यंदा मात्र मार्च महिना उजाडला तरी विध्यार्थ्यांना गणवेश प्राप्त झालेले नाहीत. गणवेश खरेदीसाठी फेब्रुवारी महिन्यात निधी मिळाला. निधी उशिरा मिळाल्यामुळे गणवेश खरेदी उशिरा झाली असल्याचे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष साहेबराव गिरासे यांनी सांगितले. तर गणवेश खरेदी कोणत्याही प्रकारचे राजकारण होत नसल्याचे शिक्षण सभापती मंगला पाटील यांचे म्हणणे आहे. निधी लवकर मिळाला असता तर विद्यार्थ्यांना लवकर गणवेश वाटप करता आले असते असे त्यांनी सांगितले.
प्रतिक्रिया -
फेब्रुवारी महिन्यात गणवेश खरेदीसाठी निधी प्राप्त झाला. काही विद्यार्थ्यांनी गणवेश खरेदी करून विद्यार्थ्यांना वाटप केले आहेत. गणवेश खरेदीत कोणतेही राजकारण नाही. निधी उशिरा आल्यामुळे अडचणी निर्मण झाल्या होत्या.
- साहेबराव गिरासे, अध्यक्ष मुख्याध्यापक संघ
गणवेश खरेदीत राजकारणाचा कोणताही विषय नाही. निधी उशिरा मिळाल्याने गणवेश खरेदी रखडली होती. आता प्रत्येक शाळेला निधी मिळाला आहे. ५० टक्के शाळांचे गणवेशाचे वाटप देखील पूर्ण झाले आहे.
- मंगल पाटील, शिक्षण सभापती
मुख्याध्यापकांच्या मागण्या काय -
१ - अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व बीपीएल धारक मुलांना गणवेश मिळतो. मात्र खुला व इतर मागास प्रवर्गातील मुलांना गणवेश मिळत नाही. सर्व मुलांना गणवेश देण्याची मागणी मुख्याध्यापकांनी केली आहे.
२ - प्रत्येक वर्षी जून महिन्यात गणवेश निधी मिळतो. यंदा मात्र आठ महिने उशिरा निधी मिळालेला आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षात जून महिन्यातच निधी मिळावा. जास्त उशीर होऊ नये.
३ - एका गणवेशासाठी शासनाकडून ३०० रुपये दिली जातात. मात्र ३०० रुपयांमध्ये चांगल्या दर्जाचा गणवेश उपलब्ध होत नाही. म्हणून गणवेश निधीत वाढ करावा अशी मागणी मुख्याध्यापक संघाने केली आहे.
४ - प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना दोन गणवेश मिळतात. यंदा मात्र कोरोनाचा फटका गणवेश निधीलाही बसला असून एकच गणवेश विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मात्र पुढील शैक्षणिक वर्षांपासून दोन गणवेश मिळण्याची मागणी करण्यात आली आहे.