दीपावलीने केले दोंडाईचा आगाराला मालामाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 12:16 IST2020-11-19T12:16:35+5:302020-11-19T12:16:50+5:30
एका आठवड्यात मिळाले ३१ लाख ७० हजार रुपयांचे उत्पन्न

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी दोंडाईचासह राज्यात राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशी वाहतूक बंद केली होती. दरम्यान कोरोना रुग्णांची घटती संख्या व दीपावलीच्या काळात दोंडाईचा आगाराने वाढविलेल्या विविध गावांचा फेऱ्या आदींमुळे दोंडाईचा एस.टी. आगार आठवडाभरात मालामाल झाले आहे. दीपावलीच्या काळात दोंडाईचा आगाराने आठवडे भरात ३१ लाख ७० हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी २३ मार्चपासून राज्यभरात प्रवाशी वाहतूक बंद करण्यात आली होती. मध्यतरी जिल्हा अंतर्गत एका सीटवर एक प्रवाशी वाहतुकीस परवानगी मिळाली होती. उत्पन्न कमी झाल्याचा पार्श्वभूमीवर माल वाहतूक सेवा सुरू करण्यात आली. त्यात दोंडाईचा आगाराला पावणेचार लाखाचे उत्पन्न मिळाले.
राज्य परिवहन महामंडळाच्या आदेशाने आता पूर्ण क्षमतेने दोंडाईचा आगारातून प्रवाशी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. दोंडाईचा आगारातून लांब पल्ल्याच्या कल्याण, नाशिक, परभणी, जळगाव, औरंगाबाद, पुणे यांच्यासह सुरत, वापी या अन्य राज्यीय बसेसही सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरीय प्रवाशी वाहतूक सुरू झाली. प्रवाशाचा चांगला प्रतिसास मिळत आहे. आगार कार्यालयात सॅनिटायझर दिसले. परंतू बहुसंख्य प्रवाशांनी मास्क लावलेले दिसले नाही, फिजीकल डिस्टन्सिंग अजिबात दिसले नाही, बसमध्ये चढताना वा उतरतांना प्रवाशांनी गर्दी केलेली दिसली. कोरोना हद्दपार झाल्याची भावना प्रवाशांमध्ये दिसून आली. प्रवाशांचा हलगर्जीपणा कोरोनास आमंत्रण देऊ शकतो.
दरम्यान, दीपावलीचा सण व वाढती प्रवाशी संख्या लक्षात घेता दोंडाईचा आगाराने बस फेऱ्याची संख्या वाढविलेली आहे. पुण्याचा दोन फेऱ्या होत होत्या. त्या आता सहा करण्यात आल्या आहेत. नाशिक १० फेऱ्या होत्या, त्या आता १२ तर जळगावच्या ८ फेऱ्या होत्या, त्या आता १२ करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात फक्त ४ ते ५ हजार कि.मी. प्रवास करीत असत. आता बस सुमारे १६ हजार कि.मी. प्रवास करीत आहेत.
लॉकडाऊन काळात दोन ते अडीच लाखाचे उत्पन्न होते. आता पाच ते साडेपाच लाखाचे उत्पन्न झाले आहे. आता सर्व बसेस मिळून ११९ फेऱ्या होत आहेत. वाढती प्रवाशी संख्या त्यातून वाढणारे उत्पन्न यामुळे कर्मचाऱ्यांतही समाधान निर्माण झालेले दिसले. आगारास पूर्वीचे चांगले दिवस येतील, असा आशावाद त्यांच्यात दिसला.
दीपावलीचा कार्यकाळ बघता दोंडाईचा आगाराने गाड्याची व फेऱ्याची संख्या वाढवली आहे. दररोज ८ ते ९ हजार प्रवाशी प्रवास करीत आहेत. तर बसेस दररोज १५ ते १६ हजार किमी धावत आहेत. १२ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या आठवडाभरात दोडाईचा आगारास चांगले उत्पन्न मिळाले. १२ नोव्हेंबरला ३ लाख १० हजार, १३ नोव्हेंबरला ४ लाख १० हजार, १४ नोव्हेंबरला ३ लाख ५० हजार, १५ नोव्हेंबरला ५ लाख, १६ व १७ नोव्हेंबरला प्रत्येकी ५ लाख ५० हजार तर १८ नोव्हेंबरला ५ लाख असे ३१ लाख ७० हजार रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले असल्याची माहिती दोंडाईचा आगार सूत्रांनी दिली.