लांडोर बंगला राष्ट्रीय स्मारक घोषित करून ५ कोटींचा निधी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:40 IST2021-08-13T04:40:30+5:302021-08-13T04:40:30+5:30
धुळे : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धुळ्यातील लांडोर बंगल्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करून या स्मारकाच्या विकासाकरिता ...

लांडोर बंगला राष्ट्रीय स्मारक घोषित करून ५ कोटींचा निधी द्या
धुळे : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धुळ्यातील लांडोर बंगल्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करून या स्मारकाच्या विकासाकरिता ५ कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वाल्मीक दामोदर यांनी केली आहे. दलितमित्र वाल्मीक दामोदर यांनी गुरुवारी समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त भगवान विर यांची नाशिक येथे भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर न्यायालयीन कामकाजासाठी सन १९३७ मध्ये धुळ्याला आले असताना त्यांनी ३०, ३१ जुलै आणि १ ऑगस्ट असे सलग तीन दिवस ऐतिहासिक किल्ले लळींग येथील लांडोर बंगल्यावर वास्तव्य केले होते. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या लांडोर बंगला परिसरात सन १९९२ पासून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी ३१ जुलै रोजी भीमस्मृती मेळावा होतो. या मेळाव्यात धुळे, नाशिक, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील तसेच गुजराथ, मध्य प्रदेश येथील हजारो भीमसैनिक, अनुयायी मिळेल त्या वाहनांनी व पायी लांडोर बंगला येथील बाबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येतात. बाबासाहेब ज्या खोलीत वास्तव्यास होते, त्याच खोलीत बाबासाहेबांचा अर्धाकृती पुतळा बसविला आहे. त्यामुळे लांडोर बंगल्याचे नाव भीमस्मृती असे ठेवले आहे.
या ऐतिहासिक लांडोर बंगल्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून शासनाने घोषित करावे. तसेच या बंगल्याचे व परिसराचे नूतनीकरण, सुशोभिकरण करून शाहु, फुले, आंबेडकर या महापुरुषांचे ग्रंथ, पुस्तके असलेले ग्रंथालय, अभ्यासिका व येणाऱ्या अनुयायांसाठी राहण्याकरिता विश्रामगृहाचे बांधकाम करावे. लांडोर बंगल्याच्या दर्शनी भागातील भिंतीवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध पैलू दर्शविणारे ब्रांझ धातूचे शिल्प लावण्यात यावे. या विकास कामांसाठी धुळे वन विभागाला ५ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.