धुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:40 IST2021-08-12T04:40:56+5:302021-08-12T04:40:56+5:30
धुळे : जिल्ह्यात पुरेसा पाऊस नसल्याने दुष्काळ जाहीर करावा, जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडावा, अशी मागणी काॅंग्रेसने केली आहे. ...

धुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा
धुळे : जिल्ह्यात पुरेसा पाऊस नसल्याने दुष्काळ जाहीर करावा, जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडावा, अशी मागणी काॅंग्रेसने केली आहे. याबाबत धुळे ग्रामीणचे आमदार तथा काॅंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसह काॅंग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.
जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करताना आमदार कुणाल पाटील यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्यातील अनेक भागांत पावसाने धुमाकूळ घातलेला असूनही धुळे जिल्ह्यात मात्र तीन-चार आठवड्यांपासून पावसाने दडी मारली आहे. पिके कोमेजू लागली आहेत. जिराईत शेतीकडे पाहिले तर जीव कासावीस होतो. बागायतदार शेतकरीसुद्धा विहिरीतील पाणी तळाला गेल्याने चिंतित आहेत. जिल्ह्यात अद्याप एकदाही मुसळधार पाऊस झाला नसल्याने नद्या, नाले, ओढे कोरडेठाक आहेत. परिणामी विहिरींचा उद्भव आटत आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील मध्यम, लघू आणि इतर पाटबंधारे प्रकल्पांत पाण्याचा साठा अत्यंत कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे. तीन आठवड्यांपासून सोसाट्याचा वारा वाहत आहे. आभाळात ढग दाटून येत आहेत; पण पाऊस मात्र पडत नाही. गेल्या आठवड्यात कडक ऊन पडल्याने पिके अधिक प्रमाणात कोमेजू लागल्याने पिकांची अवस्था नाजूक झाली आहे. उभ्या असलेल्या इतर पिकांवर पावसाअभावी रोगाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वच जण पावसाची चातकसारखी वाट पाहत आहेत. एकीकडे शेतीचे हे संकट निर्माण झाले असताना काही गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असल्याचे गेल्या दोन वर्षांत स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, आर्थिक आधार देण्यासाठी या सरकारने कधीच मागे-पुढे पाहिले नाही. धुळे जिल्ह्यातील ही अवर्षणप्रवण बाब शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी आणि जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, जिल्ह्यातील शेतकरी, विद्यार्थी, व्यावसायिक सर्वांनाच योजनेचा लाभ द्यावा, जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या बाबतीत शासनस्तरावर आपण संवाद साधून प्रयत्न करावेत, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
गुलाबराव कोतेकर, डॉ. दरबारसिंग गिरासे, बाजीराव पाटील, महिला काँग्रेस अध्यक्ष गायत्री जयस्वाल, साहेबराव खैरनार, डाॅ. दत्ता परदेशी, पंढरीनाथ पाटील, अशोक सुडके, योगेश पाटील, शिरीष सोनवणे, अशोक राजपूत, अरुण पाटील, सोमनाथ पाटील, अविनाश महाजन, अर्जुन पाटील, बापू खैरनार, सुनील ठाकरे, जे. डी. पाटील, प्रदीप देसले, शिवाजी अहिरे, दिलीप शिंदे, ज्ञानेश्वर मराठे, एन. डी. पाटील, संतोष राजपूत, झुलाल पाटील, रावसाहेब पाटील, गणेश मधुकर गर्दे, राजीव पाटील, पंकज चव्हाण, हर्षल साळुंके, किरण नगराळे, हसन पठाण, आबा गर्दे, आबा पगारे, दिनेश महाले, आबा शिंदे, सतीश रवंदळे, विशाल पाटील, उपसरपंच कुणाल पाटील, अरुण पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.