आदिवासी आश्रमशाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 22:39 IST2020-12-02T22:39:31+5:302020-12-02T22:39:51+5:30
केवळ २८ टक्के पालकांची संमती

dhule
धुळे : जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळा सुरू करण्याचा प्रश्न लांबणीवर पडला आहे. आश्रमशाळा निवासी असल्याने अधिक काळजी घ्यावी लागेल. तसेच मुख्याध्यापकांचा अभिप्राय आवश्यक आहे. कोरोनाच्या परिस्थितीचा तसेच आश्रमशाळांमधील सुरक्षेच्या तयारीचा संपूर्ण अभ्यास करुनच निर्णय घेतला जाइल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील शाळा आणि आश्रमशाळा सुरू करण्याच्या संदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभाग आणि आदिवासी विकास विभागाची बैठक झाली. प्रतिबंधित क्षेत्र वगळता जिल्ह्यातील ग्रामीण भागात इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग ७ डिसेंबरपासून सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली. तसेच शहरी भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय दुसऱ्या टप्प्यात घेतला जाइल असा निर्णय घेण्यात आला.
परंतु आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळा सुरू करण्याच्या बाबतीत या बैठकीत निर्णय होवू शकला नाही. आश्रमशाळा निवासी असल्याने पुर्णवेळ मास्क, सॅनिटायझर आणि इतर सुरक्षा उपकरणांची व्यवस्था आहे किंवा नाही, सोशल डिस्टन्सिंगचे पालन होइल किंवा नाही आदी प्रश्न आहेत. शिवाय आश्रमशाळेतील विद्यार्थींच्या पालकांपैकी केवळ २८ टक्के पालकांनी संमती दिली आहे. पालकांची पुर्ण संमती मिळाल्याशिवाय आश्रमशाळा सुरू करणे योग्य होणार नाही. तसेच या बाबतीत मुख्याध्यापकांचा अभिप्राय देखील आवश्यक असल्याने त्यांचा अभिप्राय मागविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाबाबतच्या परिस्थितीचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतरच आश्रमशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
विद्यार्थी संख्या अशी
धुळे जिल्ह्यात आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत २५ वसतिगृह असून त्यात ३ हजार ५१० विद्यार्थी आहेत. आश्रमशाळांची संख्या २२ असून त्यात ९ हजार ४६ विद्यार्थी आहेत. खाजगी अनुदानित ३४ आश्रमशाळा असून त्यात १९ हजार २२५ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थींच्या सुरक्षेचा प्राधान्याने विचार केला जात आहे.