शिंदखेडानजिक बसमधून पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 18:35 IST2018-03-03T18:35:16+5:302018-03-03T18:35:16+5:30
बोरसे कुटुंबिय स्तब्ध : गावात व्यक्त होतेय हळहळ

शिंदखेडानजिक बसमधून पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : महामंडळाच्या धावत्या बसमधील दरवाजा अचानक उघडल्याने बारावीचा विद्यार्थी खाली कोसळला़ त्याला जबर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू ओढवल्याची घटना शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली़ या घटनेमुळे बोरसे कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे़
सध्या दहावी आणि बारावीचे पेपर सुरु आहेत़ बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी विक्की सुदाम बोरसे (१७) (रा़ अमराळे) हा शिंदखेडा येथे परीक्षा देण्यासाठी गेला़ गणित विषयाचा पेपर देवून एमएच २० डी ९४७३ क्रमांकाच्या शिंदखेडा-वाडी या बसमध्ये तो अमराळे गावाकडे जाण्यासाठी निघाला़ शिंदखेडापासून १ किमी अंतरावर स्टेशनरोडवरील हॉटेल सुरभिसमोर धावत्या बसचा दरवाजा अचानक उघडला़ दरवाजाजवळ विक्की हा उभा असल्याने अचानक तो खाली कोसळला़ त्याला डोक्यासह अन्य अवयवांना जबर दुखापत झाली़ परिणामी त्याचा जागीच मृत्यू ओढवला़ बसमध्ये परीक्षार्थीची संख्या आणि इतर प्रवासी मोठ्या प्रमाणात होते़ गर्दी प्रचंड असल्याने तो दरवाजाजवळच उभा होता़ अचानक ही दुर्घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे़ विक्की हा घरचा एकलुता होता़ त्याला आई-वडील, दोन बहिणी आहेत़ पैकी एका बहिणीचे दहावीचे पेपर सुरु आहेत़