तरुणाचा धावत असताना पडल्यामुळे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 22:48 IST2020-02-04T22:48:07+5:302020-02-04T22:48:35+5:30
थाळनेर येथील घटना, गावात व्यक्त होतेय हळहळ

तरुणाचा धावत असताना पडल्यामुळे मृत्यू
थाळनेर : शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील १७ वर्षीय तरुणाचा मंगळवारी सायंकाळी धरमखोई नाल्यात रनिंग करताना दम लागून पडल्यामुळे जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली़
शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील राजे डी. एस. जमादार जूनियर कॉलेजच्या अकरावी सायन्सचा विद्यार्थी कपिल सोमनाथ पाटील (ठाकरे) (१७, रा.थाळनेर) हा मंगळवारी ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान मित्रांसोबत नेहमीप्रमाणे व्यायाम करण्यास गेला होता. थाळनेर मांजरोद रस्त्यावरील धरमखोई नाल्यात मित्रांसोबत नेहमीप्रमाणे रनिंग करीत असतांना त्याला दम लागला. यावेळी त्याच्या मित्रांनी त्यास थांबण्यास सांगितले. तो रस्त्यावर पडला व बेशुद्ध झाला. मित्रांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला़ परंतु तो जागेवरुन सरकलाही नाही. मित्रांनी त्याला लगेच गावातील डॉक्टरांकडे नेले. त्यावेळी डॉक्टरांनी तपासून त्यास शिरपूरला नेण्यास सांगितले. कपिल याला बेशुद्धावस्थेत तात्काळ शिरपूरला नेण्यात आले. शिरपूरला येथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
मयत कपिल हा गावातील सोमनाथ भालेराव ठाकरे मुलगा आहे. त्याच्या पश्चात आई-वडील व एक मोठा भाऊ, आजी, काका, काकू व भाऊ असा परिवार आहे. त्याच्या अचानक निधनामुळे थाळनेर गावात शोककळा पसरली आहे.