तार कंपाउंडमध्ये मृतदेह; शेजारी विषाची बाटली, आत्महत्येचा संशय
By देवेंद्र पाठक | Updated: December 12, 2023 17:16 IST2023-12-12T17:15:36+5:302023-12-12T17:16:07+5:30
गेल्या दोन दिवसांपासून दगडू पाटील हे काही कामानिमित्त बाहेर गेले ते घरी आलेच नव्हते, कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती

तार कंपाउंडमध्ये मृतदेह; शेजारी विषाची बाटली, आत्महत्येचा संशय
धुळे : तालुक्यातील वडेल नगाव रस्त्यावर असलेल्या तार कंपाऊंडच्या शेतात सोमवारी रात्री एका इसमाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती पश्चिम देवपूर पोलिसांना कळताच पोलिस दाखल झाले. तपासणी आणि चौकशी केली असता दगडू त्र्यंबक पाटील (वय ४५. रा. पारोळा, जि. जळगाव, ह.मु वर्षावाडी, मोहाडी उपनगर, धुळे) असे मयत इसमाचे नाव आहे.
गेल्या दोन दिवसांपासून दगडू पाटील हे काही कामानिमित्त बाहेर गेले ते घरी आलेच नव्हते, कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. ते सापडत नसल्याने मोहाडी पोलिस ठाण्यात त्यांच्या हरविल्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर कुटुंबीयांसह पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केलेला होता. अशातच वडेल नगाव रस्त्यावर एका इसमाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या जवळच विषाची बाटली पडलेली होती. पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार त्यांचे वर्णन निघत असल्याने कुटुंबीयांना बोलावून घेण्यात आले. त्यानंतर त्यांची ओळख पटली. त्यांच्या मृतदेहाजवळ एक विषाची बाटली आणि जवळच मोबाइल देखील फ बाटली सापडल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. वडेल नगाव रस्त्यावर त्यांची स्कूटी उभी होती, असे देखील पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.