धुळ्यात दीड दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 21:57 IST2020-04-09T21:56:54+5:302020-04-09T21:57:40+5:30
आदेश पारीत : प्रभावी अंमलबजावणी होणार

धुळ्यात दीड दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’
धुळे : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यात शुक्रवारी रात्री १२ वाजेपासून ते रविवारच्या पहाटे ५ वाजेपर्यंत संपूर्ण ‘लॉकडाऊन’ (संचारबंदी) करण्यात येणार आहे. प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी याबाबत आदेश काढला आहे.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधक कायदा लागू केला आहे. परस्पर संपर्कामुळे या विषाणूचा संसर्ग व प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेवून मानवी जीविताला, आरोग्याला किंवा सुरक्षिततेला संकट निर्माण होवू शकते. तसेच पोलिस अधीक्षक यांनी सादर केलेला अहवाल पूर्णत: संचारबंदी लागू करण्याबाबत त्यांनी विनंती केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रभारी जिल्हाधिकारी जगदाळे यांनी त्यांना प्राप्त अधिकारांनुसार संपूर्ण धुळे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात फौजदारी दंडसंहिता प्रक्रिया कलम १४४ (१) (३) अन्वये आदेश काढला आहे. यात अत्यावयशक सेवेसह कायदा व सुव्यवस्थासाठीचे मनुष्यबळ अपवाद असतील, असेही जिल्हाधिकारी जगदाळे यांनी म्हटले आहे.
पिंपळनेरला १४ पर्यंत पूर्ण लॉकडाऊन
पिंपळनेरला मालेगाव येथून भाजीपाला येतो. मालेगावला ५ कोरोनाचे रुग्न सापडले असल्याने दक्षता म्हणून ग्रामपंचायतीने पिंपळनेर आणि सामोडे शुक्रवारपासून १४ एप्रिलपर्यंत पाच दिवस पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच दिवस सर्व दुकाने बंद राहतील. कोणालाही घराबाहेर निघता येणार नाही.
सेंधव्याला आणखी दोन रुग्ण सापडले
मध्यप्रदेशातील सेंधवा येथे कोरोनाबाधीत आणखी दोन रुग्ण सापडले़ रुग्णांची संख्या १२ वरुन १४ पर्यंत पोहचली आहे़ त्यामुळे पळासनेर येथे आरोग्य यंत्रणा सज्ज झाली़