सुरत-नागपूर महामार्गावर मजुरांचा वाहनाला लटकून धोकेदायक प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 22:29 IST2020-07-30T22:28:51+5:302020-07-30T22:29:01+5:30
नेर : पोटाची खळगी भरण्यासाठी कोरोना संसर्गाची भीतीही उरली नाही

सुरत-नागपूर महामार्गावर मजुरांचा वाहनाला लटकून धोकेदायक प्रवास
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनाने सर्वांना हैराण केले आहे. तर लॉकडाऊनने अनेकांचा रोजगार गेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. आता शिथिलता मिळाल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी कोरोना संसर्गाची भीतीही उरलेली नसल्याचे दिसून येत आहे. सुरत-नागपूर महामार्गावर मजूर अक्षरश: वाहनाला लटकून जीवघेणा प्रवास करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
नेरसह परिसरातील नागरिकांचा शेती आणि शेतमजुरी हा व्यवसाय आहे. तर काही जण हातमजुरी करुन उदरनिर्वाह करतात. परंतू गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनाने सर्वांचा रोजगार हिरावून घेतला आहे. त्यामुळे आता जगण्यासाठी नागरिक मजुरीसाठी घराबाहेर पडू लागले आहेत. मात्र, घरापासून आणि गावापासून कामाचे ठिकाण लांब असल्याने मिळेल त्या वाहनाने ते कामावर जात आहेत. यासाठी एखाद्या वाहनाला लटकून प्रवास करावा लागत आहे. यामुळे कोणतेही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. तोंडावर मास्क किंवा रुमालही राहत नाही. पोटाच्या खळगीपुढे आता त्यांना कोरोनाची भीतीही वाटेनासी झाली आहे. मजुरांना कामावर दुचाकीने जाणेही परवडणारे नाही. त्यात रस्त्यावर वाहनांची संख्या कमी असल्याने मिळेल त्या वाहनाने अक्षरश: लटकून प्रवास करावा लागत आहे. नेर परिसरातील हे दृश्य बेकायदा असले तरी परिस्थितीने हतबल झालेल्यांना पर्याय उरला नसल्याचे द्योतक आहे.