शाळेची जीर्ण इमारत धोकेदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 22:49 IST2019-11-06T22:49:08+5:302019-11-06T22:49:51+5:30
लगत भरते अंगणवाडी : शाळा सुटेपर्यंत पालकांचा जीव लागतो टांगणीला

dhule
मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील केंद्रीय जिल्हा परिषद कन्या शाळा नं. २ नादुरुस्त इमारत जमीनदोस्त करा. जवळच अंगणवाडीचे वर्ग भरत असून वादळी वाऱ्यामुळे, तसेच जीर्ण झालेल्या भिंती पावसामुळे पडून गंभीर दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिक्षण विभागाने याची दखल घ्यावी, अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे.
मालपूर येथील केंद्रीय जिल्हा परिषदेची शाळा असून या स्वतंत्र तीन शाळा आहेत. शाळा नं. १ व कन्या शाळा नं. २ या एकाच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ स्वतंत्र भरतात. पैकी कन्या शाळेची पश्चिमेकडील इमारत नादुरुस्त असल्याचे दिसून येते.
येथे तीन वर्गखोल्या असून दोन वर्गांना नवीन पत्रा टाकला आहे, तर एका खोलीचा अर्धवट उडालेला पत्रा असून भिंती देखील जीर्ण झालेल्या दिसून येतात. परतीचा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. यामुळे या भिंती अधिक भिजून जीर्ण झाल्या आहेत. अजूनही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या इमारतीचा धोका कायम आहे. तसेच वारा वादळ आल्यास पत्रा उडून व भिती कोसळून मोठी दुर्घटना घडण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
या इमारतीला लागून जवळच अंगणवाड्यांचे वर्ग भरत असतात. तसेच शाळा नं. १ व २च्या लहान विद्यार्थ्यांचा येथील पटांगणात सतत वावर दिसून येतो. यासाठी ही इमारत तात्काळ जमिनदोस्त करण्याची गरज आहे. अन्यथा दिवसा वादळ वाºयासह जोरदार पाऊस आल्यास गंभीर घटना घडनू कोणाला जीव गमवावा लागल्यास अन्यथा जखमी झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न पालकवर्गाच्या चर्चेतून पुढे येत आहे.