पावसामुळे नुकसान, पंचनामा करून अहवाल पाठवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:42 IST2021-09-08T04:42:53+5:302021-09-08T04:42:53+5:30
धुळे- शिरूड- बोरकुंड बोरी परिसरासह धुळे तालुक्यात पावसात झालेल्या वित्त व जीवित नुकसानीचा तातडीने पंचनामा करून अहवाल ताबडतोब शासनास ...

पावसामुळे नुकसान, पंचनामा करून अहवाल पाठवा
धुळे- शिरूड- बोरकुंड बोरी परिसरासह धुळे तालुक्यात पावसात झालेल्या वित्त व जीवित नुकसानीचा तातडीने पंचनामा करून अहवाल ताबडतोब शासनास सादर करण्याच्या सूचना धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पुरेपूर मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही आमदार पाटील यांनी सांगितले आहे.
धुळे तालुक्यात मुसळधार पावसासह सततधार पाऊस चालू आहे आणि ठिकाणी सरासरीपेक्षाही जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे धुळे तालुक्यात शेतीसह घरांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीची तातडीने दखल घेऊन आमदार कुणाल पाटील यांनी महसूल विभागाशी तात्काळ संपर्क साधला आणि झालेल्या नुकसानीचा विनाविलंब पंचनामा करण्याच्या सूचनाही दिल्या. नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी महसूल व कृषी विभागांशी चर्चा केली आहे. याबाबत माहिती देताना आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले आहे की, धुळे तालुक्यात बोरी परिसरात रविवारी तीन तासांत १०४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे बोरी व कानोली नदीला पूर आला असून, अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी शिरले आहे. बोरी परिसरात शिरूड, बोरकुंड, मोरदड, विंचूर, चांदे, खोरदड, नाणे, सिताने, दोंदवाड, मांडळ, रतनपुरा, तरवाडे, जुनवणे, निमगूळ, धामणगाव, बोधगाव या परिसरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी घरांची पडझड झालेली आहे, तसेच शेतांमध्ये पाणी शिरल्याने पिकांचेही नुकसान झाले आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचा महसूल व कृषी विभागाने संयुक्तरीत्या तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना आमदार कुणाल पाटील यांनी दिल्याने बोरी परिसरासह धुळे तालुक्यात पंचनाम्याचे काम सुरू झाले आहे. येत्या दोन दिवसांत पंचनाम्याचे काम संपवून तातडीने शासनास अहवाल सादर करण्याच्याही सूचना आमदार पाटील यांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर न सोडता पावसामुळे झालेल्या नुकसानीची पूर्णपणे भरपाई मिळवून देऊ, असे आमदार पाटील यांनी सांगितले आहे.