शिरपूर आगाराला रोजचा आठ लाखांचा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:32 IST2021-04-26T04:32:58+5:302021-04-26T04:32:58+5:30

सध्या मालवाहू एस. टी. सेवाही बंद आहे. प्रवासी नसल्याने एस. टी. सुरू कशी ठेवायची, असा प्रश्न एस. टी. प्रशासनाला ...

Daily loss of Rs 8 lakh to Shirpur depot | शिरपूर आगाराला रोजचा आठ लाखांचा तोटा

शिरपूर आगाराला रोजचा आठ लाखांचा तोटा

सध्या मालवाहू एस. टी. सेवाही बंद आहे. प्रवासी नसल्याने एस. टी. सुरू कशी ठेवायची, असा प्रश्न एस. टी. प्रशासनाला पडला आहे.

ब्रेक द चेन मिशनअंतर्गत १५ एप्रिलपासून मिनी लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने अनेकांनी घरातच बसणे पसंत केले आहे. तसेच ग्रामीण भागातील लोकही शहरात खरेदीसाठी येणे आता कमी झाले. अनेकांनी लॉकडाऊन होणार या भीतीने अगोदरच घरातील सामान भरून ठेवले आहे, तर दुसरीकडे शाळा, महाविद्यालये सध्या बंद आहेत.

गेल्या वर्षी कोरोना काळात एस. टी.ने मालवाहतूक केली. पण, यावेळी अद्याप तशी परिस्थिती उद्भवलेली दिसून येत नाही. त्याशिवाय बाहेरगावी जाणाऱ्या मजुरांना या एस. टी. बस सोडण्यासाठी जात असत. पण, यावेळी मजुरांनी अगोदरच गावी जाणे पसंत केल्याचे दिसून आले. या संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद आहेत.

लॉकडाऊनपूर्वी शिरपूर आगाराच्या ४३० बसफेऱ्या सुरू होत्या. एस. टी. फेऱ्या बंद असल्याने दिवसाला एस.टी.चे ८ लाख एवढे नुकसान होत आहे. मात्र, पुरेसे प्रवासी मिळाल्यास धुळे व जळगाव येथे १-२ फेऱ्या मारल्या जात असून, त्यातून दररोज २० हजाराचे उत्पन्न आगाराला मिळत आहे. ब्रेक द चेन मिशनअंतर्गत लोकांनी घरीच राहाणे पसंत केल्याने हा फटका बसला आहे.

आगारासमोर प्रश्न उभा

एसटी प्रशासनाने धुळे येथे जाण्यासाठी २ फेऱ्या, तर जळगाव येथे जाण्यासाठी १ फेरी सुरू केली आहे. मात्र, तेही पुरेशी प्रवासी संख्या मिळाल्यास गाडी सुटते. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद असल्याने प्रवासीच नसतील तर एस. टी. कोणासाठी सोडायची? असा प्रश्न येथील आगारासमोर उभा ठाकला आहे. अपुऱ्या प्रवासी संख्येमुळे इंधन खर्चाला सामोरे जाण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. या आगाराच्या ९४ बसेस आहेत. आवश्यक असलेल्या चालक-वाहकांनाच ड्युटीवर बोलावले जाते. अन्य कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे पगार दिला जात आहे. बाकीच्या सर्वांना सद्यस्थितीत घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Web Title: Daily loss of Rs 8 lakh to Shirpur depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.