गावाचे कारभारी कोण ठरणार याची लागली उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:32 IST2021-01-18T04:32:40+5:302021-01-18T04:32:40+5:30
दरम्यान, आता उत्सुकता लागलेली आहे ती मतमोजणीची. सोमवारी सकाळी ९ वाजेपासून निकाल लागण्यास सुरुवात होणार आहे. प्रशासनानेही मतदानाची पूर्ण ...

गावाचे कारभारी कोण ठरणार याची लागली उत्सुकता
दरम्यान, आता उत्सुकता लागलेली आहे ती मतमोजणीची. सोमवारी सकाळी ९ वाजेपासून निकाल लागण्यास सुरुवात होणार आहे. प्रशासनानेही मतदानाची पूर्ण तयारी केलेली आहे. उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झालेले असले, तरी ग्रामस्थांना आपल्या गावाचा कारभारी कोण होणार, याची उत्सुकता लागून राहिलेली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर झालेल्या या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी प्रचंड उत्साह दाखवित भरघोस मतदान केलेले होते. हे मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार, याची उत्सुकता आता सर्वांना लागून राहिलेली आहे.
गेल्या दहा-अकरा दिवसांपासून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ग्रामीण भागात निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. कुठेही प्रचार सभा, अथवा मोठ्या नेत्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला नसला, तरी छुप्या पद्धतीने सर्वच पक्षाचे नेते या निवडणुकीवर लक्ष ठेवून होते. अर्ज माघारीनंतर काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. या बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींवर लागलीच अनेक पक्षांना झेंडा फडकविल्याचा दावा केलेला आहे.
मात्र, ग्रामपंचायती निवडणुका या पक्षाच्या झेंड्याऐवजी स्थानिक पातळीवरच लढवल्या जातात. प्रत्येक गावातील पॅनल प्रमुखांनीही निवडणुकीसाठी प्रचंड जोर लावलेला होता. वॉर्ड लहान असले, तरी एकाच वॅार्डात दोन-तीन उमेदवार असल्याने, प्रचंड चुरस निर्माण झालेली होती. काही ठिकाणी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असेही चित्र दिसून आले. मात्र, आता हे सर्व आटोपले असून, आता पुढील पाच वर्षांसाठी आपल्या वॉर्डाचा प्रतिनिधी, तसेच गावाचे कारभारी कोण-कोण होतात, याचीच उत्सुकता सर्वांना लागून आहे.
अद्याप सरपंच आरक्षण जाहीर झालेले नाही. मात्र, या निवडलेल्या सदस्यांमधूनच सरपंच होणार असल्याने, सरपंचपदाची माळ कोणत्या प्रवर्गाच्या गळ्यात पडणार, ते येत्या काही महिन्यात समजणार आहे.