कौटुंबिक न्यायालयात सांस्कृतिक कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 11:46 IST2019-11-18T11:45:45+5:302019-11-18T11:46:45+5:30
बालदिनाचे औचित्य : वाद असलेल्या कुटुंबातील मुलांबरोबर उपक्रम

dhule
धुळे : येथील कौटुंबिक न्यायालयात बाल दिनानिमित्त कौटुंबिक वादविवाद असलेल्या कुटुंबातील मुलांबरोबर १६ रोजी सायंकाळी बालदिन साजरा करण्यात आला. यावेळी मुलांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी न्यायाधीश न्या.डी.एम. उपाध्ये तर प्रमुख पाहुणे म्हणून वैशाली उपाध्ये उपस्थित होते.
कौटुंबिक वादविवाद असलेल्या कुटुंबातील मुलांबरोबर बालदिन साजरा करत वादविवाद असलेल्या कुटुंबातील मुला-मुलींमधील कलागुणांना वाव मिळावा व त्यांना प्रेरणा मिळावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सदरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वादविवाद असलेल्या कुटूंबात लहान मुलांच्या मनावर वाईट परिणाम होऊ नये, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे, कुटुंबातील कलहामुळे मुलांकडे आई-वडीलांचे दुर्लक्ष होऊ नये. यासाठी अशा मुलांना सोबत घेऊन बालदिन साजरा करण्यात आला.
कौटुंबिक न्यायालयातील कर्मचाऱ्यांचे पाल्य देखील यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित मुलांनी नृत्य, गायन, मिमिक्री, कविता, विनोद आदी कार्यक्रमांचे सादरीकरण केले.
कुटुंब न्यायालय कायदा १९४८ हा विशेषत: वैवाहिक व कौटुंबिक कलह सोडविण्यासाठी कुटुंब न्यायालयाची निर्मिती झाली आहे. कौटुंबिक न्यायालयात तडजोड घडविण्यासाठी समुपदेशकाचा महत्वाचा सहभाग असतो. या अनुषंगानेच धुळ्यात २८ जुलै २०१८ रोजी कौटुंबिक न्यायालयाचे उदघाटन झाले आहे.
कार्यक्रमास कौटुंबिक न्यायालयाचे विवाह समुपदेशक अनुराधा खरात, प्रबंधक ए.व्ही. मिर्झा, सहा. अधीक्षक एम.बी. जोशी, लघुलेखक एच.ए. रामोळे, समुपदेशक इंदिरा बैसाणे यांनी सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भावना बागल, महेंद्र सूर्यवंशी, दिनेश मोहिते, राकेश मोरे, एस.बी. अहिरराव, एजाज शेख, एस.एस. उंदरे यांनी प्रयत्न केले.