जिल्ह्यातील पिके, सिंचनाची माहिती होईल आता ऑनलाईन; धुळे जिल्ह्यातही राबविणार ई-पीक पाहणी उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:40 IST2021-08-12T04:40:59+5:302021-08-12T04:40:59+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात मंगळवारी दुपारी महसूल व कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जिल्हास्तरीय अभिमुखता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात ...

जिल्ह्यातील पिके, सिंचनाची माहिती होईल आता ऑनलाईन; धुळे जिल्ह्यातही राबविणार ई-पीक पाहणी उपक्रम
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात मंगळवारी दुपारी महसूल व कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जिल्हास्तरीय अभिमुखता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, ‘आत्मा’चे प्रकल्प उपसंचालक एस. डी. मालपुरे, तहसीलदार गायत्री सैंदाणे, सुनील सैंदाणे, अप्पर तहसीलदार संजय शिंदे, तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे, आदी उपस्थित होते.
हेमांगी पाटील यांनी सांगितले की, टाटा ट्रस्टच्या सहकार्याने मोबाईल ॲपद्वारे ई-पीक पाहणी आज्ञावली विकसित करण्यात आली आहे. या आज्ञावलीचा प्रयोग पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील करंजपाडा येथे यशस्वीरीत्या राबविण्यात आला आहे. ई-पीक पाहणी प्रकल्पाची यापूर्वी राज्यातील २० तालुक्यांमध्ये यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. आता खरीप हंगाम २०२१-२०२२ पासून सर्व जिल्ह्यांत अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ई-पीक पाहणी कार्यक्रमात शेतकऱ्यांचा सक्रिय आणि व्यापक सहभाग आवश्यक आहे. त्यासाठी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पीकपाहणीची जलद, वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक पद्धतीने माहिती संकलित करण्यात येणार आहे. तलाठ्यांचे काम सोपे होण्यास मदत होणार आहे.
या ॲपच्या माध्यमातून अधिप्रमाणित रिअल टाइम डाटा उपलब्ध होणार आहे. मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे स्वत:च्या शेतातील उभ्या पिकांची माहिती, अक्षांश-रेखांश दर्शविणाऱ्या पिकांच्या छायाचित्रासह ही माहिती उपलब्ध होणार आहे. पिकांच्या नोंदणीबरोबरच जलस्रोतांची साधने, सिंचनाचा प्रकार, बांधावरची झाडे, पालेभाज्या, शेडनेट हाऊस, पॉली हाऊस, विहीर पड, इमारत पड यांसारख्या कायम पडचीही नोंद करता येणार आहे.
पिकांच्या नुकसान भरपाईसाठी उपयुक्त
‘आत्मा’चे प्रकल्प उपसंचालक मालपुरे म्हणाले, या ॲपमध्ये ३५२ पिकांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. त्यानुसार हे ॲप वेळोवेळी अद्ययावत होईल. या ॲपच्या माध्यमातून पीकपाहणीची वस्तुस्थितिदर्शक व सत्यस्थितिदर्शक माहिती संकलित होईल. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई योग्य प्रकारे मदतीसाठी उपयुक्त ठरणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘विकेल ते पिकेल’ या योजनेसाठी हे ॲप उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.