शिरपूर तालुक्यात पावसाअभावी पिके संकटात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:41 IST2021-08-17T04:41:37+5:302021-08-17T04:41:37+5:30
शिरपूर : यंदा पर्जन्यमान अति उत्तम असल्याचे सांगितले जात होते़ त्यानुसार मान्सूनचे आगमनही वेळेवर झाले होते़ सुरूवातीच्या ...

शिरपूर तालुक्यात पावसाअभावी पिके संकटात!
शिरपूर : यंदा पर्जन्यमान अति उत्तम असल्याचे सांगितले जात होते़ त्यानुसार मान्सूनचे आगमनही वेळेवर झाले होते़ सुरूवातीच्या नक्षत्रातील दमदार पावसामुळे सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या़ मात्र, पुन्हा पावसाने दडी मारली आणि शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या़ त्यानंतर पुन्हा पावसाची कृपादृष्टी झाली़ मात्र, त्यानंतर गेल्या २० दिवसांपासून पावसाने दडी मारली असून, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय अशी म्हणण्याची वेळ आली आहे़
शिरपूर तालुक्यातील १ लाख ४ हजार १७३ हेक्टर सर्वसाधारण खरीप क्षेत्रापैकी आतापर्यंत ९९ हजार ७५६ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड करण्यात आली आहे़ ९५़७५ टक्के खरीप पिकांची लागवड झाली आहे़ तालुक्यात आतापर्यंत केवळ २१६ मिमी पाऊस झाला आहे़ केवळ ३३ टक्के पाऊस झाल्याने शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत दिसून येत आहेत़ श्रावण महिना सुरू झाला. ऑगस्ट महिना निम्मा झाला तरीदेखील दमदार पाऊस झाला नसल्याने तालुक्यातील नदी-नाले पाण्याने खळखळून वाहिले नाहीत़, तर विहिरींची पाणीपातळी वाढली नाही़ तालुक्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात काही भागात पाऊस झाला़ मात्र, आतापर्यंत दमदार पाऊस बोराडी, सांगवी वगळता अन्य भागांत कुठेच झाला नाही़ केवळ ३३ टक्केच या तालुक्यात आतापर्यंत पाऊस झाला आहे़ थाळनेर व होळनांथे मंडळात अद्यापही पेरणीलायक पाऊस झालेला नाही़ पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहे़ अल्पशा पावसावर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची लागवडी केली आहे़ त्यामुळे बहुतांशी भागात दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे़ तालुक्यात नगदी पीक समजल्या जाणाऱ्या कापूस पिकाची सर्वाधिक ६७ हजार ५९५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे़ त्या खालोखाल सोयाबीन ६१३०, मका ७९८०, खरीप बाजरी ४७७१, ज्वारी ३७२८, ऊस २१२८, मूग ३४४८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे़
गेल्या २० दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे़ त्यामुळे पुन्हा पिकांनी माना टाकल्या आहेत़ येत्या दोन-चार दिवसांमध्ये पाऊस न पडल्यास खरीप हंगाम धोक्यात सापडणार आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत़ ऐन हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम पूर्णत: वाया जाण्याच्या अवस्थेत असून, जमिनीला मोठमोठ्या भेगा पडत असल्याने शेतजमिनीसह आता शेतकऱ्यांची मनेही भेगाळली आहेत़ पेरणीपूर्वी पडणारा अन् पेरणीनंतरचा पाऊस मात्र गायब झाला आहे़ दरवर्षी शेतकऱ्यांना अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे़ यंदाही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे़
अशी झाली पेरणी़़़
तृणधान्य १७५११ पैकी १६७३४
कडधान्य ७६९८ पैकी ६०९२
गळीत धान्य ९८८० पैकी ७१३७
एकूण १०४१७३ पैकी ९९७५६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे़
झालेला पाऊस़़़
१६ रोजी पर्यंत मंडळनिहाय झालेला पाऊस पुढील प्रमाणे- शिरपूर २१६ मिमी, थाळनेर- १२२, होळनांथे- ११५, अर्थे- १५३, जवखेडा-१४८, बोराडी-२४४, सांगवी-२१२ मिमी आतापर्यंत झाला आहे़
शेतकरी काय म्हणतात़़
पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आहे़ पिके वाचविण्यासाठी ठिबकद्वारे पाणी द्यावे लागत आहे़ कोरडवाहू शेतकऱ्यांचे अधिक हाल होत असल्याने चिंताजनक परिस्थिती आहे़ महागडे औषधी, बियाणे व मजुरांचा खर्च करून पेरणी केली़; परंतु पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे़
- छगन गुजर, शेतकरी निमझरी
आगोदर चांगले पर्जन्य झाले, नंतर पावसाने दडी मारली़ त्यामुळे वाढायला लागलेले पिके कडक उन्हामुळे कोेमेजून जात आहेत़ सोयाबीन लागलेले फुले गळत असून, कापसाचीही तीच अवस्था आहे़ आता पाऊस थांबल्याने शेतकऱ्यांसमोर अवघड परिस्थिती उभी टाकली आहे़
- विकास पावरा, शेतकरी रोहिणी