भाजपाविरुद्ध गुन्हेगारीचा मुद्दा बनला कळीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 05:37 IST2018-12-06T05:37:38+5:302018-12-06T05:37:40+5:30
महापालिका निवडणुकीचा प्रचार ‘गुन्हेगारी’ याच मुद्याभोवती फिरत असून सर्वच पक्षाचे नेतेमंडळी या मुद्यावरुन भाजपला आपले लक्ष्य बनवित असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

भाजपाविरुद्ध गुन्हेगारीचा मुद्दा बनला कळीचा
- राजेंद्र शर्मा
धुळे : येथील महापालिका निवडणुकीचा प्रचार ‘गुन्हेगारी’ याच मुद्याभोवती फिरत असून सर्वच पक्षाचे नेतेमंडळी या मुद्यावरुन भाजपला आपले लक्ष्य बनवित असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
आमदार अनिल गोटे यांनी गुन्हेगारीच्या मुद्यावरुन भाजपविरुद्ध बंडखोरी करीत लोकसंग्राम पक्षातर्फे स्वतंत्र उमेदवार उभे केले. ते याच मुद्यावर सतत बोलत असतात. त्यांचे मुख्य ‘टार्गेट’ भाजपच आहे. राष्टÑवादीतून सर्वच गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना भाजपने प्रवेश व उमेदवारी दिल्याने आता गुन्हेगारीच्या मुद्यावरुन माझे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्याशी असलेले भांडण संपले आहे. त्यांच्याशी माझा कुठलाही वैयक्तिक वाद नसल्याचे सांगत आमदारांनी माजी आमदारांना ‘क्लिन चिट’ देऊन टाकली.
आ. गोटे यांनी नंतर आणखी एक खेळी खेळली. त्यांनी शिवसेनेच्या पाच उमेदवारांना लोकसंग्रामचा एकतर्फी पाठिंबा देऊन टाकला. यामुळे राष्टÑवादीतून भाजपमध्ये गेलेल्या मनपातील माजी पदाधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न ठरला.