शिरपूरला चार फे-यांंत होणार मतमोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:31 IST2021-01-17T04:31:12+5:302021-01-17T04:31:12+5:30
१५ रोजी एकूण ७६़३६ टक्के मतदान झाले़ एकूण मतदान ५२ हजार १५४ होते, त्यापैकी ३९ हजार ८२३ मतदारांनी मतदानाचा ...

शिरपूरला चार फे-यांंत होणार मतमोजणी
१५ रोजी एकूण ७६़३६ टक्के मतदान झाले़ एकूण मतदान ५२ हजार १५४ होते, त्यापैकी ३९ हजार ८२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ बाळदे, भटाणे, बोरगाव, भोरखेडा व बाभुळदे अशा पाच ग्रामपंचायतींमध्ये केवळ एका जागेसाठी निवडणूक घेण्यात आली़
मात्र, या गावांमध्ये फारसा उत्साह मतदारांमध्ये दिसून आला नाही़ बलकुवे, कुवे, चाकडू, होळ, उप्परपिंड, दहिवद, नटवाडे, जामन्यापाडा, गरताड, भाटपुरा, साकवद, जुने भामपूर, मांडळ, वरूळ, विखरण, शिंगावे, शेमल्या याठिकाणी आमनेसामने लढती असल्यामुळे मतदारांचा उत्साह दिसून आला़
बिनविरोध ग्रामपंचायत
माघारीअंती घोडसगाव, पिंपळे, वाठोडा, असली, हिंगोणीपाडा व भावेर अशा सहा ग्रामपंचायतींसह १११ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत़
३ जागा रिक्त :
बोरगाव येथे ७ जागांपैकी ४ बिनविरोध, २ रिक्त तर १ जागेसाठी २ उमेदवार रिंगणात होते़ बाभुळदे येथे ७ जागांपैकी ५ बिनविरोध, १ रिक्त तर १ जागेसाठी २ जण रिंगणात होते़ बोरगाव व बाभुळदे येथील रिक्त असलेल्या ३ जागेकरिता केव्हा निवडणूक होते, याकडे लक्ष लागले आहे़
४ फे-यांत मतमोजणी
१८ रोजी सकाळी ९ वाजेपासून येथील तहसील कार्यालयात मतमोजणी केली जाणार आहे़ ७ टेबलांवर एकाच वेळी एका गावाचीच मतमोजणी केली जाणार आहे, जेणेकरून मतमोजणी ठिकाणी अधिक गर्दी होणार नाही़ पहिल्या फेरीत शिंगावे, दहिवद, चाकडू, कुवे, जातोडा, साकवद, दुस-या फेरीत नटवाडे, जामन्यापाडा, जवखेडा, शेमल्या, बलकुवे, सावळदे, मांडळ, तिस-या फेरीत जुने भामपूर, उप्परपिंड, कळमसरे, भाटपुरा, होळ, हिंगोणी बु़, वरूळ तर शेवटच्या अंतिम फेरीत बाळदे, बोरगाव, गरताड, बाभुळदे, भटाणे, टेकवाडे, भोरखेडा या गावांची मतमोजणी केली जाणार आहे़ एकूण चार फे-यांत मतमोजणी केली जाणार आहे़
सरपंच आरक्षणाकडे लक्ष
युती सरकारच्या काळात सरपंचपद थेट जनतेतून निवडून दिले जात होते़ आता महाविकास आघाडी सरकारच्या काळात निवडून आलेल्या सदस्यांमधूनच सरपंचपद निवडले जाणार आहे़ कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या़ निवडणूक आयोगाने नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्यात़ ग्रामपंचायतींचे मतदान १५ रोजी झाले़ कदाचित २२ जानेवारीनंतर सरपंच आरक्षण सोडत होणार आहे़ या सोडतीकडे आता गावपुढा-यांचे लक्ष लागून राहिले आहे़