मनपाचे रस्ते ठरताहेत अपघाताला कारणीभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:36 IST2021-01-23T04:36:49+5:302021-01-23T04:36:49+5:30
शहरातील वाडीभोकर रस्त्यावर गटारीच्या कामासाठी मध्यभागी खड्डा खोदण्यात आला आहे. खोदकाम करताना निघालेली माती रस्त्याच्या दुतर्फा टाकण्यात आल्याने वाडीभोकरकडे ...

मनपाचे रस्ते ठरताहेत अपघाताला कारणीभूत
शहरातील वाडीभोकर रस्त्यावर गटारीच्या कामासाठी मध्यभागी खड्डा खोदण्यात आला आहे. खोदकाम करताना निघालेली माती रस्त्याच्या दुतर्फा टाकण्यात आल्याने वाडीभोकरकडे जाणारा एका बाजूचा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे काही महिन्यांपासून नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. काॅलनी भागातील सांडपाण्याची विल्हेवाट पाइपलाइन टाकली जात आहे. त्यासाठी ठिकठिकाणी चेंबर बनविण्यात येत आहेत. मात्र, रस्त्यापेक्षा चेंबरची उंची मोठी असल्याने हेच चेंबर आता नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. रस्त्यावर काम सुरू असल्याच्या सूचना लावण्यात आलेल्या नाहीत. काही ठिकाणी गटारीचे पाइप आडवे लावण्यात आले आहेत. त्यामुळे रात्री या भागातील काही पथदिवे बंद पडल्यास या भागात अंधार होतो. त्यामुळे वाहनचालकांचा अंदाज चुकल्याने अनेक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. मात्र, अधिकारी व लोकप्रतिनिधी समस्या सोडविण्यास अपयशी ठरत आहेत.
रस्त्यावर पाइप अनेक महिन्यांपासून पडून
वलवाडीभोकर रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. या कामासाठी रस्ते पूर्ण खोदून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना एकवीरा देवी मंदिरापासून ते स्टेडियमपर्यंत दोन ते तीन कि.मी.पर्यंतचा प्रवास करताना रस्त्यावर कसरत करावी लागत आहे. या रस्त्याच्या कामासाठी मधोमध पाइप ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे रात्री पथदिवे बंद असल्याने वाहनांचा अपघातात होतो.
चेंबर ठरताहेत नागरिकांसाठी जीवघेणे
वाडी भोकरसह अन्य रस्ते तयार करताना अनेक ठिकाणी गटारीचे चेंबर वर आलेले दिसून येतात. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना चेंबर लक्षात येत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. वाडी भोकर रस्त्यावर दाेन ते तीन ठिकाणी चेंबर वर आलेले आहेेत, तर रस्त्यावर खडी पडून आहे.
वाहतूक कोंडीचा त्रास
कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद होती. मात्र, हळूहळू शाळा सुरू होत असल्याने रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. वाडी भोकररोडवर मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा व महाविद्यालय, तसेच क्लास असल्याने अनेकांचा या रस्त्यांशी संपर्क येतो. शिवाय एकच रस्ता सुरू असल्याने वाहतूक कोंडीचा अधिक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
रस्त्यावर उकीरडा
देवपूर भागातील स्टेडियमकडे जाणाऱ्या रस्त्याच्या एकीकडे भूमिगत गटार झालेली आहे. मात्र, मध्येच या गटारीचे काम बंद पडले आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी काॅलनीतून निघणारे घाण पाणी गटारीद्वारे रस्त्यावर येते. त्यामुळे अभियंतानगरच्या फलकापासून काही अंतरावरील रस्त्यावर चिखल साचला आहे. त्यामुळे वाहनचालकांना अडचणीला सामाेरे जावे लागते.