कोरोनामुळे धुळ्यातील ग्रामीण भागात अंधश्रध्देचे फुटले पेव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 11:48 IST2020-03-23T11:48:02+5:302020-03-23T11:48:26+5:30
अफवांचे पिक : वलवाडी शिवारातील कॉलनी परिसरात शनिवारी रात्री बाराला दिवे

कोरोनामुळे धुळ्यातील ग्रामीण भागात अंधश्रध्देचे फुटले पेव
धुळे : कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीच्या सावटामुळे अफवा आणि अधंश्रध्दांना ऊत आला आहे़ आतापर्यंत केवळ अफवांचे पिक होते़ परंतु आता अंधश्रध्दाही बळावली आहे़ रात्री बारा वाजता निंबाच्या झाडाखाली दिवे लावले तर कोरोनाचे संकट टळेल, अशी अंधश्रध्दा ग्रामीण भागासह शहरातही पसरली असून शनिवारी रात्री बारा वाजता अनेक महिलांनी दिवे लावून अंधश्रध्दा पाळली़
सध्या सर्वत्र कोरोना हाच विषय आहे़ कोरोनाचा विषाणू ज्या वेगाने पसरत आहे; त्याच वेगाने अफवा देखील पसरत आहेत़ कोरोनाच्या या उद्रेकात अफवांचे पिक आले असून त्यात समाज भरडला जात आहे़ उष्ण वातावरणात हा विषाणू जगू शकत नाही, भारतात तापमान जास्त असल्याने कोरोनाची भिती बाळगण्याची गरज नाही अशी अफवा सुरूवातील पसरली आणि आज ती फोल ठरली आहे़ त्या पाठोपाठ तुरटी, फणस, मद्य, कापूर, आयुर्वेदीक आणि होमियोपॅथी औषधे, गोमूत्र असे एक ना अनेक उपचार सोशल मीडियावरुन नुसते व्हायरलच झाले नाहीत तर अंमलातही आणले गेले़ कोरोनाचा संसर्ग मांसाहाराशी जोडणे ही सर्वात मोठी अफवा ठरली़ तसेच कोरोनाच्या संसर्गासाठी मध्यंतरी पाळीव प्राण्यांना दोषी ठरविण्यात आले़ अनेकांनी पाळीव प्राणी घराबाहेर काढले़ त्यानंतर नॉस्टॅडॅमसच्या भविष्यवाणीचेही फोटा व्हायरल झाले़ कोरोना हे चीनने जगावर सोडलेले अस्त्र आहे आणि हे सिध्द करण्यासाठी काही एडीट केलेले फोटोही सोशल मीडियावर गाजले़ जनता कर्फ्यूच्या दिवशी ड्रोनद्वारे आकाशातून फवारणी होणार असल्याची अफवा धुळे शहरात गेले दोन दिवस होती़ अफवांच्या पिकात वाढलेला हा संसर्ग कमी होण्याचे नाव घेत नाही़ देशासह राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या तासागणिक वाढतच आहे़ त्यामुळे महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे़
शासन, प्रशासनाच्या पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोना प्रभावीपणे सुरू असताना शनिवारी सायंकाळनंतर ग्रामीण भागामध्ये एक वेगळीच अफवा वाऱ्यासारखी पसरली़ वडाच्या किंवा निंबाच्या झाडाखाली दिवा लावला तर कोरोनाचे संकट टळेल अशी ती अफवा होती़ त्यामुळे गावागावात महिलांनी दिवे लावण्याचा सपाटा लावला होता़ ही अफवा सोशल मीडियावरही चांगलीच व्हायरल झाली़
अंधश्रध्दा दिवे पेटविण्याची
वडाच्या किंवा निंबाच्या झाडाखाली दिवा पेटवला तर घरातील मुलांवरचे कोरोनाचे संकट टळेल़ एक मुलगा असेल तर एक दिवा आणि दोन मुले असतील तर दोन दिवे लावावे़ त्यामुळे शनिवारी सायंकाळपासून ग्रामीण भागात महिलांनी दिवे लावण्यासाठी गर्दी केली होती़ ही अंधश्रध्दा शहरात पोहोचायलाही उशिर लागला नाही़ ग्रामीण भागातील महिलांनी शहरातील नातेवाईकांना याबद्दल माहिती दिली़ वलवाडी शिवारात कॉलनी परिसरातील काही महिलांनी इतरही महिलांना घरोघरी जावून जागे केले़ रात्री बारा वाजता झाडाखाली दिवे पेटविण्यात आले़ कोरोनाच्या प्रतिबंधासाठी शासनातर्फे गर्दी टाळण्याचे प्रयत्न सुरू असताना अशा प्रकारच्या अफवांमुळे गर्दीला प्रोत्साहन मिळत आहे़