धुळे - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. धुळे शहर कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरला आहे. धुळे शहरात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. त्यासोबतच मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. कोविड रुग्णांची संख्या वाढत असताना धुळे महानगरपालिकेला निधीसोबतच मनुष्यबळाचीही अडचण भासत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेतर्फे विविध उपाययोजना सुरू आहेत. त्यासाठी आतापर्यंत २ कोटी ३० लाख रुपये इतका मिळालेला निधी खर्च झाला आहे. औषधी खरेदी करणे, कोरोनाबाधित रुग्णांचे जेवण व वाहनांचा खर्च आदी बाबींवर ही रक्कम खर्च करण्यात आली आहे. महानगरपालिकेने आणखी निधी जिल्हा प्रशासनाकडे मागितला आहे. मात्र, अद्याप महानगरपालिकेला निधी मिळालेला नाही. टप्प्याटप्प्याने निधी मिळतो. लवकरच निधी प्राप्त होईल, असा विश्वास महानगरपालिकेचे आयुक्त अजीज शेख यांनी व्यक्त केला आहे. आतापर्यंत वेळेवर निधी मिळत आला आहे. निधीअभावी कोणत्या उपाययोजना रखडलेल्या नाहीत. निधीचा पुढचा टप्पाही लवकरच मिळेल, असे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त आहेत. त्याचा फटका कोरोनाकाळात बसतो आहे.
निधीच्या अडचणीचे परिणाम
धुळे शहर कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट ठरले आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त रुग्ण धुळे शहरात आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेला तात्काळ निधी प्राप्त होण्याची गरज आहे. अन्यथा रुग्णांसाठी आवश्यक औषध खरेदी, जेवण आदी गोष्टींवर परिणाम होऊ शकतो.
कोविड केअर सेंटर वाढवायचे पण
महानगरपालिकेचे सध्या ३ कोविड केअर सेंटर सुरू आहेत. त्यात, तंत्रनिकेतन महाविद्यालय, अजमेरा महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरचा समावेश आहे. शहरात वाढणारी बाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता आणखी कोविड सेंटर सुरू करणे गरजेचे आहे. मात्र, आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त आहेत. मनुष्यबळाचीही कमतरता भासत आहे.
जिल्हा यंत्रणेकडे निधीची मागणी केली आहे. टप्प्याटप्प्याने निधी प्राप्त होतो. निधीअभावी कोणत्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना रखडल्या आहेत असे वाटत नाही. कोरोना उपाययोजनांसाठी आतापर्यंत पुरेसा निधी मिळाला आहे. रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.
- अजीज शेख, आयुक्त मनपा धुळे