नेरमध्ये आढळला कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 13:25 IST2020-06-15T13:25:27+5:302020-06-15T13:25:51+5:30
तहसीलदारांची भेट : वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांना काळजी घेण्याचे आवाहन

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना धुळे तालुक्यातील नेर आणि वडणे येथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे़ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ग्रामीण तहसीलदारांनी रविवारी सकाळी भेट देवून पाहणी केली़ ग्रामस्थांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या़
तालुक्यातील सर्वात मोठे नेर हे गाव आहे़ दोन ते तीन महिन्यापासून कोरोना आजारासंदर्भात जनजागृती करण्यात येत होती, कोरोनाशी लढा देत असताना इतर रोगराई बाबत ग्रामपंचायती कडून काळजी घेण्याचे आव्हान करण्यात येत होते़ गावातील ग्रामपंचायत प्रशासन, प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस प्रशासन, कोरोना वारीअर्स, पोलीस पाटील, गावातील जेष्ठ नागरिक यांच्याकडूनही कोरोना आजारापासून सावध रहा असे आवाहन करण्यात येत होते़ तरीसुध्दा कोरोनाचा शिरकाव गावात झाला़ कोरोना बाधित रुग्णाचा गावात संपर्क आल्याने चिंतेचे वातावरण तयार झाले आहे़ रुग्ण ज्या भागात राहतो तो परिसर सील करण्यात आला़
धुळे ग्रामीण तहसीलदार किशोर कदम, गट विकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, नेर मंडळाधिकारी राजेंद देवरे, कुसुंबा तलाठी एस़ जी़ सूर्यवंशी, कोतवाल नाना कोळी, सरपंच शंकरराव खलाणे, ग्रामविकास अधिकारी संजय देवरे, मनिष जोशी, लिपिक संजय वाघ, हर्षल मोरे, राकेश जाधव, साफसफाई कर्मचारी, वॉटरमन आदीनी बाधीत रुग्णाच्या परिसरात भेट दिली़ त्यानंतर तहसीलदार यांनी आवश्यक त्या सूचना करीत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले़
नेर व परिसरात गेल्या दोन ते तीन महिन्यापासून सुरक्षित असलेल्या नेर गावात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर बाधिताच्या संपर्कातील २१ व्यक्तींना धुळे जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले़ प्रतिबंधित क्षेत्रात बघ्यांनी गर्दी केली होती़ गल्लीत लाकडी दांड्या लावून रस्ता बंद करण्यात आला़ तात्काळ नेरचे सरपंच शंकरराव खलाणे यांनी दखल घेत नागरीकांनी घराच्या बाहेर निघू नये़, अशी दवंडी गावात रिक्षाद्वारे फिरविली़ कंटेन्मेंट झोनमध्ये औषधांची फवारणी करण्यात आली़ रुग्ण संपर्कातील नागरिकांना मास्क, सॅनिटायझरचेही वाटप करण्यात आले़