धुळे जिल्ह्यात ‘कोरोना’ पॉझिटिव्ह ६६़़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 22:11 IST2020-05-15T22:10:53+5:302020-05-15T22:11:26+5:30

आरोग्य विभाग सतर्क : कंटेनमेंट झोनवर लक्ष केंद्रीत, झोनमधील होणार सर्वांचीच तपासणी

Corona positive 66 in Dhule district | धुळे जिल्ह्यात ‘कोरोना’ पॉझिटिव्ह ६६़़

धुळे जिल्ह्यात ‘कोरोना’ पॉझिटिव्ह ६६़़

धुळे : प्रसुतीसाठी हिरे महाविद्यालयात दाखल झालेल्या महिलेचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच येथील जिल्हा कारागृहातील कैद्याचा हिरे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. रुग्णालयाने त्याचे स्वॅब घेतले होते. त्याचा अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला. तो सुद्धा पॉझिटिव्ह आला आहे. आता जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६६ झाली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असताना देखील भंगार बाजार परिसरात एक कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आला आहे़ हा भाग यापुर्वीच कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत केलेला आहे़ अशा परिस्थितीमुळे प्रशासनापुढे एक प्रकारे चिंतेचे वातावरण निर्माण होऊ पाहत आहे़ परिणामी हॉटस्पॉट म्हणून या भागाकडे पाहण्याची वेळ धुळेकरांवर येत आहे़
कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होण्यास सुरुवात झाली असल्याचे चित्र शुक्रवारी पुन्हा एकदा उमटले़
आरोग्याची यंत्रणा सतर्क
शहरातील तिरंगा चौक परिसरात एक रुग्ण आढळल्यानंतर सतर्कता बाळगण्यास सुरुवात करण्यात आली़ यंत्रणा तिकडे लक्ष देत नाही तोच मच्छिबाजार, गजानन कॉलनी, स्नेह नगर, मोहाडी परिसर अशा एकूण २४ ठिकाणी कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्यामुळे स्थानिक प्रशासन अलर्ट झाले आहे़ एका मागोमाग एक रुग्ण या भागात आढळण्यास सुरुवात झाली आहे़
परिसरात औषधांची फवारणी
शहरातील ऐंशीफुटी रोडसह तिरंगा चौक, मच्छिबाजार, ताशागल्लीसह अन्य २४ ठिकाणी आरोग्याची यंत्रणा पोहचली आहे़ त्यापाठोपाठ आता संपूर्ण भागात सॅनिटायझरसह औषधांची फवारणी अतिशय वेगाने करण्याचे काम प्राधान्याने सुरु झाले आहे़ या भागातील नागरीकांच्या घरासह गल्लीबोळातील रस्त्यावर फवारणी केली जात आहे़ याकामी अतिरिक्त आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे़ एकेक भागात जावून औषधांची फवारणी प्रामुख्याने आरोग्य निरीक्षकांच्या उपस्थितीत केली जात असल्याचे दिसून येत आहे़
२४ कंटेनमेंट झोन निश्चित
महानगरात कोरोनाबाधीत रुग्ण आढळून येत असल्यामुळे ज्या ज्या भागात रुग्ण आढळत आहेत त्याठिकाणी महापालिका प्रशासनाने कंटेनमेंट झोन तयार केले आहेत़ निश्चित केलेल्या झोनमध्ये चारही बाजूने तटबंदी केली जात आहे़ या २४ झोनमध्ये प्रामुख्याने गजानन कॉलनी, मच्छिबाजार महानगर पालिकेचा दवाखाना, ताशा गल्ली, वडजाई रोड क्रॉसिंग, मुस्लिम नगर, स्रेह नगर, समाधान नगर मोहाडी, एकता नगर नगावबारी, ८० फुटी रोडवरील तिरंगा चौक, अकबरी मशिद परिसर, गरीब नवाज नगर भाग, एसआरपी गट क्रमांक ६ तापी वस्तीगृह, चक्करबर्डी येथील जीएमसी बॉईज हॉस्टेल, देवपुरातील मोहम्मदी नगर, नगावबारीजवळील स्वामी समर्थ केंद्र, नकाणे रोडवरील सुधा हॉस्पिटलजवळील परिसर, कोरके नगर व महावीर सोसायटी, मोहाडी येथील वालचंद नगर, शासकीय दूध डेअरीजवळील समता नगर, एसआरपीएफ ५०० क्वॉर्टरमधील इमारत क्रमांक पी १ बी १ एफ १, एसआरपीएफ १०० क्वॉर्टर, सुरत बायपासवरील गोजरेताई भामरे सहकारी सोसायटी, साक्री रोडवरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय जवळ सत्यसाईबाबा कॉलनी आणि माधवपुरा यांचा समावेश आहे़
८३ वर्षाच्या वृध्देसह चौघे कोरोनामुक्त
हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेले आणखी चार रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. धुळे शहरातील गरीब नवाज नगर परिसरातील ८३ वर्षीय वृद्धेनेही कोरोनावर विजय मिळवला आहे. वृद्धेच्या परीवारातील आणखी दोन सदस्य कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेले चारही रूग्ण धुळे शहरातील आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील २२ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या साठीपार पोहचली असलीतरी येथून बरे होणाऱ्यांची संख्या तशी मोठी आहे़ श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाला कोविड रुग्णालय घोषीत केल्यानंतर अधिष्ठाता डॉ़ नागसेन बोरसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ़ राजकुमार सूर्यवंशी, डॉ़ निर्मलकुमार रवंदळे अधिपरिचारीका अरुणा भराडे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांनी अथक परिश्रम घेऊन कोविड रुग्णांना केवळ मानसिक आधारच नव्हे तर योग्य उपचार करुन कोरोनामुक्त केले आहे़
या अगोदर १८ कोरोनाबाधीत उपचार घेवून कोरोनामुक्त झाले आहेत़
मृत बंदिवानाच्या संपर्कातील सर्वांची तपासणी शक्य
धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचा चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा ९ मे रोजी सायंकाळी न्यायालयीन कोठडीत गेल्याने जिल्हा कारागृहात दाखल झाला होता. तो दाखल झाला तेव्हा नशेत असल्या सारखा होता.
त्याची कारागृहातील रुग्णालयात तपासणी केली. त्यानंतर त्याने जेवण केले. नंतर ११ व १२ तारखेला त्याने जेवण केले नाही. तेव्हा त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले.
१३ मेला त्याचा मृत्यू झाला. तो शुक्रवारी पॉझिटिव्ह निघाल्याने कारागृहात तो ज्याच्या संपर्कात आला असे सर्व कर्मचारी आणि कैद्यांची तपासणी करुन त्यांना क्वारंटाईन करण्याचे काम होणार आहे़

Web Title: Corona positive 66 in Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे