कोरोना होऊन गेला; इतर आजारांवरील शस्त्रक्रिया करायची कधी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:34 IST2021-09-13T04:34:42+5:302021-09-13T04:34:42+5:30
धुळे - कोरोना होऊन गेला; आता इतर आजारांवरील शस्त्रक्रिया कधी करायची यावरून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अनेकांच्या शस्त्रक्रिया ...

कोरोना होऊन गेला; इतर आजारांवरील शस्त्रक्रिया करायची कधी ?
धुळे - कोरोना होऊन गेला; आता इतर आजारांवरील शस्त्रक्रिया कधी करायची यावरून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अनेकांच्या शस्त्रक्रिया त्यामुळे रखडलेल्या आहेत. कोरोना होऊन गेल्यानंतर किमान २१ दिवसांनी शस्त्रक्रिया करावी असे कोरोना नोडल अधिकारी डॉ.विशाल पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. आता शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली आहे; मात्र कोरोना होऊन गेल्यानंतर किती दिवसांनी शस्त्रक्रिया केली पाहिजे याबाबत रुग्णांमध्ये काहीसा संभ्रम दिसून येत आहे; मात्र कोरोनातून बरे झाल्यानंतर २१ दिवसानंतर शस्त्रक्रिया करण्यास हरकत नसल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली.
शस्त्रक्रियेसाठी २१ दिवस वाट पाहा...
कोरोनातून बरे झाल्यानंतर किमान २१ दिवसानंतर शस्त्रक्रिया करता येते. मागील दीड वर्षापासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु होता. त्यामुळे शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय व शहरातील इतर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत.
इमर्जन्सी शस्त्रक्रिया
- कोरोना झालेला असताना इमर्जन्सी शस्त्रक्रिया करावी लागली तर डॉक्टर व रुग्ण दोघांनाही काळजी घ्यावी लागते.
- रुग्णाला भूल देताना त्याची थुंकी किंवा लाळ तोंडावर येणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक असते.
प्लॅन शस्त्रक्रिया
- कोरोना झाल्यानंतर १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा. त्यानंतर पुढील आठवडा विश्रांती घेतल्यानंतर शस्त्रक्रिया करता येते.
- तसेच ऑक्सिजनची पातळी कमी असेल तर शस्त्रक्रिया करता येत नाही. त्यासाठी ऑक्सिजनची पातळी ९५ पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
कोरोनामुळे जिल्ह्यातील इतर व्याधी असलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया रखडल्या होत्या. आता सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियांना सुरुवात झाली आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर किमान २१ दिवस झाल्यानंतर शस्त्रक्रिया करता येते.
- डॉ. विशाल पाटील
जिल्हा कोरोना नोडल अधिकारी
कोरोनाचे एकूण रुग्ण - ४२५१५
बरे झालेले रुग्ण -४१८४५
एकूण कोरोना बळी - ६६८
सध्या उपचार सुरु असलेले - २