कोरोनामुळे जीवन जगणे झाले अशक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 22:00 IST2020-08-08T22:00:29+5:302020-08-08T22:00:47+5:30
संडे अँकर । हमालांची व्यथा, कोरोना आल्यापासून कामांची बोहोनी देखील होत नसल्याची व्यक्त झाली खंत़

कोरोनामुळे जीवन जगणे झाले अशक्य
दोंडाईचा : कोरोना संचारबंदीत बाजार समिती व इतर ठिकाणी हमालीवर गुजराण करण्याऱ्या हमाल-कष्टकरीचे जीवन जगणे अशक्य झाले आहे. चार-चार दिवस बोहोनोही होत नसल्याने खायचे काय? एवढे कठीण दिवस कधीही पाहिले नाहीत, कसे-बसे जीवन जगत असल्याची व्यथा हमाल बांधवांनी मांडली.
कोरोना पार्श्वभूमीवर शासनाने संचारबंदी लागू केल्याने लहान विक्रेत्याचेही हाल झालेत. अनेकांचे व्यवसाय बंद झाले. हातावर पोट भरणाºया हमालांचे सर्वाधिक हाल झालेत. सुमारे १३५ दिवस झाले असून अजूनही कोरोना संसर्ग कमी व्हायला तयार नाही. अशा परिस्थितीत दोंडाईचा शहरातील हमाली करून गुजरान करणाºया हमालांची स्थिती हलाखीची झाली आहे. दोंडाईचा शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती व स्टेशन भागातील महादेव मंदिर म्हणजे पार ओटा या ठिकाणी हमाल बांधव लोटगाडी घेऊन थांबलेले असतात.
कोरोनामुळे शासनाने संचारबंदी घोषित केली. नंतर जनता कर्फ्यू, नंतर दोंडाईचा बंद, पुन्हा पाच दिवसांचा दोंडाईचा जनता कर्फ्यूमुळे बाजार समिती बंद होती. सुरुवातीचे काही दिवस जीवनावश्यक वस्तू सोडता सर्वच दुकाने बंद आदींमुळे हमाल बांधवांना हमाली मिळणे मुश्किल झाले. आर्थिक दु:ख विसरण्यासाठी काही हमाल व्यसनाधीन झालेत. कोणीतरी येईल आपल्याला साहित्य नेण्यास सांगून हमाली देईल अशा केविलवाणी नजरेने हमाल येणाºया जाणाºयाचे निरीक्षण करतात़
सद्य परिस्थितीत बाजार समिती बंद आहे. मार्केट सुरु होते तेव्हा हमाली ४०० ते ५०० रुपये मिळत होती़ आता जेमतेम ५० रुपये मिळतात, तर कधी - कधी बोहोनीही होत नाही. अशा विपरीत परिस्थितीत घर कसे चालवायचे? असा प्रश्न हमाल बांधव पुढे पडला आहे.
डोळ्यात अश्रू आले़़़
कोरोनामुळे दोंडाईचातील हमाल बांधवाची आर्थिक परिस्थिती चांगलीच हलाखीची झाली आहे. गेल्या ३० वर्षांपासून हमाली करीत असून एवढे वाईट दिवस कधीच पाहिले नाहीत, तेवढे वाईट दिवस कोरोनामुळे आलेत. अशी आपबीती सांगताना महेश पारधीच्या डोळ्यात अश्रु तरळलेत. कोरोना मुळे सर्वच हमाल बांधवांची हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाने सर्वच सर्वस्व गमाउन बसल्याने घर खर्च कसा करावयाचा असा प्रश्न पडल्याचे हमालांनी सांगितले.
कोरोना मुळे आमचे जगणे असह्य झाले आहे. दिवसाला ३०० ते ४०० रुपये हमाली मिळायची, आता जेमतेम ५० रुपये मिळतात. कधी कधी चार चार दिवस बोहोनीही होत नाही़ अशा विपरीत परिस्थितीत आम्ही खायचे काय? घर खर्च कसा करावयाचा? शासनाने आम्हास आर्थिक मदत घ्यावी़
- नाना पवार, दोंडाईचा