‘कोरोना’चा व्यावसायिकांना बसला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 13:13 IST2020-03-21T13:12:59+5:302020-03-21T13:13:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : कोरोना विषाणूचा संसर्ग भारतात वेगाने वाढतो आहे. कोरोनाने विविध व्यवसायांवर परिणाम केला आहे. कोरोनाने ...

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कोरोना विषाणूचा संसर्ग भारतात वेगाने वाढतो आहे. कोरोनाने विविध व्यवसायांवर परिणाम केला आहे. कोरोनाने शहरातील किराणा व्यवसायिकांचेही कंबरडे मोडले आहे. काही किराणा व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया ‘लोकमत’ने जाणून घेतल्या असत्या ३० ते ४० टक्क्यांपर्यंत विक्री कमी झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
शहरी भागात कोरोनाचे प्रमाण जास्त असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक शहरात येण्याचे टाळत आहेत.धुळे तालुक्यातील व जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिक किराणा साहित्य घेण्यासाठी शहरात येत असतात मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पाठ फिरवली आहे. शहरातील संतोषी माता चौक, आग्रा रोड, पाच कंदील परिसर, गांधी पुतळा आदी भागातील किराणा दुकानांना भेट दिली असता ग्रामीण भागातील ग्राहक खरेदीसाठी फिरकत नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तसेच कंपन्यांकडून येणारी आवक थांबली आहे. शहरातील ग्राहकांकडून सॅनिटायझर, हँडवॉश, डेटॉल साबण आदी विशिष्ट वस्तूंचीच मागणी केली जात आहे. ग्राहकांमध्ये कोरोनाबाबत कमालीची जागृती निर्माण झाली असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. किराणा घेण्यासाठी परत परत येऊ नका एकाच वेळेस किराणा भरून घ्या असा सल्ला स्वत: हुन देत असल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले. ऋतू चक्रानुसार काही वस्तूंची मागणी वाढत असते़ त्यानुसार त्या उत्पादनांची आवक व्यावसायिक करीत असतात. मात्र, यंदा कोरोनामुळे त्यात मोठा फरक पडला आहे. विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे थंड पेये उन्हाळ्यात विक्रीसाठी येतात़ मात्र, ग्राहकांनी त्यांच्याकडे सपशेल पाठ फिरवली असल्याचे समोर येत आहे़ थंडपेयांना आणि अन्य वस्तुंना उन्हाळ्यात मोठी मागणी असते़ यंदा कोरोनाच्या भीतीने ग्राहक त्यांना नकार देत आहेत. खरेदी करण्यासाठी टाळाटाळ
ग्रामीण भागातील ग्राहक खरेदी करण्यासाठी शहरात येण्याचे टाळत आहेत. त्याचा व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून ३० टक्के विक्री कमी झाली आहे. कोरोनामुळे थंड पेयांची विक्री पूर्णपणे थांबली आहे.
- नरेंद्र नहार, श्री प्रोव्हिजन संतोषी माता चौक