कोरोना बरोबरच आढळत आहेत जिल्ह्यात सारी आजाराचे रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 22:25 IST2020-12-01T22:25:53+5:302020-12-01T22:25:53+5:30
सध्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयात २७ रूग्णांवर सुरू आहे उपचार

कोरोना बरोबरच आढळत आहेत जिल्ह्यात सारी आजाराचे रूग्ण
धुळे :जिल्ह्यात कोरोना सोबतच सारीचेही रुग्ण आढळत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. सारी हा आजार श्वसनसंस्थेशी संबंधित आहे. कोरोना व सारी दोन्ही आजारांची लक्षणे सारखीच आहेत.
भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड विभागातच सारीच्या रुग्णांवर देखील उपचार सुरु आहेत. कोविड विभागात एकूण ४७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
त्यात, १३ कोरोनाबाधित व २७ सारीचे रुग्ण आहेत. तर ७ संशयित रुग्ण असून त्यांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत. सारी आजाराची लक्षणे कोरोनासारखीच असल्यामुळे सारीच्या प्रत्येक रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात येते.
कोरोना व सारी दोन्हीही आजारांमध्ये शास घ्यायला त्रास होत असतो. त्यामुळे कोरोना सारखीच लक्षणे असलेल्या रुग्णाचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह येतो. व त्या रुग्णाच्या चिंतेत आणखी भर पडते. असा रुग्ण सारी या आजाराचा असू शकतो.
त्यामुळे लक्षणे दिसत असतील तर लवकर कोरोनाची चाचणी करून घ्यावी. त्यामुळे उपचारांची दिशा ठरवणे सोपे जाते. व लवकर उपचार सुरु केल्यामुळे प्रकृती गंभीर होत नाही व रुग्ण लवकर बरा होऊ शकतो असे हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अतिविशेष अधिकारी डॉ.दीपक शेजवळ यांनी सांगितले.
सध्या कुणालाही श्वसनासंबंधी काही तक्रारी असल्यास आपल्याला कोरोना विषाणूची लागण तर झाली नाही ना, अशी भीती वाटते. मात्र, ही सारीची लक्षणंही असू शकतात. त्यामुळे लक्षणे जाणवत असतील तर तात्काळ कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून कमी झाली आहे.
मात्र पुढील आठवडयात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.