कोरोनामुळे पर्यावरणपुरक ‘नो व्हेईकल डे’ उपक्रमही बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:36 IST2021-05-10T04:36:25+5:302021-05-10T04:36:25+5:30

माझी वसुंधरा या मोहिमेअंतर्गत धुळे महानगरपालिकेने पर्यावरण संवर्धनासाठी स्तुत्य उपक्रम हाती घेतला होता. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी ‘नो व्हेईकल ...

Corona also shut down the eco-friendly 'No Vehicle Day' initiative | कोरोनामुळे पर्यावरणपुरक ‘नो व्हेईकल डे’ उपक्रमही बंद

कोरोनामुळे पर्यावरणपुरक ‘नो व्हेईकल डे’ उपक्रमही बंद

माझी वसुंधरा या मोहिमेअंतर्गत धुळे महानगरपालिकेने पर्यावरण संवर्धनासाठी स्तुत्य उपक्रम हाती घेतला होता. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळून दुचाकी किंवा चारचाकी वाहने न वापरता आयुक्त, महापौर, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी सायकलीवरून कार्यालयात येत होते. धुळेकरांनीदेखील सायकलीचा वापर करून प्रदूषणमुक्त शहराचे स्वप्न साकार करण्यात हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले.

माझी वसुंधरा मोहिमेंतर्गत महानगरात सातत्याने जनजागृती करण्यात येत होती. पृथ्वी, वायू, जल, अग्नी या पंचतत्त्वाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी स्वयंप्रेरणेने पुढे यावे, यासाठी विविध स्तरावर उपाययोजना व कार्यवाही करण्यात आली. या मोहिमेंतर्गत पहिल्या मंगळवारी ‘नो व्हेइकल डे’ म्हणजेच सायकल वापरा दिवस साजरा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी महापौर चंद्रकांत सोनार, मनपा आयुक्त अजीज शेख, उपायुक्त गणेश गिरी, मनपा स्थायी समितीचे तत्कालीन सभापती सुनील बैसाणे, सहायक आयुक्त विनायक कोते, नगरसचिव मनोज वाघ तसेच विविध विभागाचे पदाधिकारी यांनी सायकल रॅलीत सहभाग नोंदविला.

परंतु पालिका प्रशासन पुन्हा कोरोनाच्या कामात व्यस्त झाले आहे. त्यामुळे ‘नो व्हेईकल डे’चा पालिकेला विसर पडला आहे, असेच म्हणावे लागेल. अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक दुचाकी आणि चारचाकीवरून कार्यालयात येत आहेत. कठोर निर्बंधांमध्ये सकाळी ११ वाजता दुकाने बंदचे आदेश असले तरी शहरात दिवसभर वाहनांवरून फिरणाऱ्यांची गर्दी कायम असते.

कोरोना काळातच ‘नो व्हेईकल डे’ची गरज

दुचाकी आणि चारचाकी वाहनांमुळे वायू तसेच ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. हवेची गुणवत्ता खालावते. ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे धूरमुक्त धुळे शहरासाठी नागरिकांनी शक्यतो सायकलीचा वापर करावा, असा संदेश या उपक्रमातून दिला गेला. शक्य असल्यास सायकलीने प्रवास करावा, गरज असल्यावरच वाहने वापरावीत, असे आवाहन महापाैरांसह आयुक्तांनी केले होते. कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्त्व साऱ्यांनाच पटले आहे. त्यामुळे ‘नो व्हेईकल डे’ची आता खऱ्या अर्थाने गरज आहे.

Web Title: Corona also shut down the eco-friendly 'No Vehicle Day' initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.