मराठीच्या पेपरला सर्वत्र कॉपीचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 22:42 IST2020-03-03T22:41:43+5:302020-03-03T22:42:05+5:30
धुळे जिल्हा : ६३ केंद्रावर दहावीची परीक्षा सुरू, ३१ हजार ८३६ विद्यार्थी प्रविष्ट, भरारी पथकांच्या वेगवेगळ्या केंद्रांना भेटी

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महाराष्टÑ राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरूवात झाली. मराठीच्या पेपरला शहरासह ग्रामीण भागातील काही केंद्रावर कॉपीचे प्रकार घडले. त्यामुळे कॉपीमुक्त परीक्षेला पहिल्याच दिवशी हरताळ फासला गेला. दरम्यान मराठीच्या पेपरला न्याहळोद येथील केंद्रावर कॉपी करतांना माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकाने एका विद्यार्थ्याला पकडले.
दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात ३१ हजार ८३६ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. ६३ केंद्रावर परीक्षा सुरू झाली आहे.
दहावाजेपासूनच गर्दी
दहावी बोर्डाचा पहिलाच पेपर असल्याने, मंगळवारी सकाळी दहा-सव्वादहा वाजेपासूनच परीक्षा केंद्र परिसरात विद्यार्थ्यांची गर्दी होऊ लागली होती. केंद्रात आल्यावर अनेक विद्यार्थी आपला नंबर कोणत्या वर्गात आहे, याची चाचपणी करतांना दिसून येत होते.
प्रवेशद्वाराजवळच तपासणी
परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वीच प्रवेशद्वाराजवळच शिक्षकांकडून सर्वच विद्यार्थी-विद्यार्थिनींची कसून तपासणी करण्यात येत होती. परीक्षार्थिंनी आणलेल्या बॅगाही तपासण्यात येत होत्या.
१०.५० वाजता
प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती
परीक्षा केंद्रात १०.५० वाजताच विद्यार्थ्यांच्या हाती प्रश्न पत्रिका मिळाली. त्यामुळे दहा मिनीटे विद्यार्थ्यांना पेपर अवलोकन करण्यास अवधी मिळाला.
शहरातही कॉपीचे प्रकार घडले
कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी प्रत्येक केंद्रावर बैठे पथक तसेच पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. असे असतांनाही शहरातील मील परिसर, देवपूर परिसर, वलवाडी भागात असलेल्या परीक्षा केंद्रावर सर्रास कॉपीचे प्रकार घडले.
मील परिसरात असलेल्या केंद्रावर कॉपी पुरविणाºया तिघांना पोलिसांनी पकडले. थोडा ‘प्रसाद’ दिल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. देवपूर भागातही दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. कॉपी पुरविणाºयांच्या गोंगाटाचा इतर परिक्षार्थींना त्रास सहन करावा लागला.
दरम्यान जिल्ह्यातील काही केंद्रावर भरारी पथकाने भेटी दिल्याचे सांगण्यात आले.
गेल्या वर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये जातीने लक्ष दिले होते़ त्यांनी स्वत:चे भरारी पथक तयार करुन प्रत्येक पेपरला एका केंद्राला भेट देण्याचा सपाटा लावाला होता़ काही संवेदनशिल केंद्रांवर तीन तास ठिय्या मांडला होता़ तसेच परीक्षार्थी कॉपी करणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सक्त सूचना त्यांनी शिक्षण विभागाला दिल्या होत्या़
परंतु यंदा मात्र बारावीच्या परीक्षेत आलबेल होते तसेच दहावीच्या परीक्षेतही दिसते आहे़ आता उर्वरित पेपर तरी कॉपीमुक्त होणार का असा प्रश्न काही सुज्ञ पालकांनी उपस्थित केलेला आहे.
तर यापुढे कॉपी प्रकार थांबवला जाईल असे अधिकाºयांचे म्हणणे आहे.