तपासणी पथकांना सहकार्य करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 22:38 IST2020-12-02T22:38:24+5:302020-12-02T22:38:44+5:30
जिल्हाधिकारी : क्षय-कुष्ठरुग्ण शोधमोहिमेचा शुभारंभ

dhule
धुळे : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत धुळे जिल्ह्यात संयुक्त व सक्रिय क्षयरुग्ण कुष्ठ रुग्ण शोध मोहीम १६ डिसेंबरपर्यंत राबविण्यात येईल. या आजारांच्या लक्षणांनी ग्रस्त नागरिकांनी तपासणीसाठी येणाऱ्या पथकांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात क्षयरुग्ण व कुष्ठ रुग्ण संयुक्त शोध मोहिमेचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश गिरी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनीष पाटील, डॉ. जे. सी. पाटील आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत धुळे जिल्ह्यात संयुक्त व सक्रिय क्षय व कुष्ठ रुग्ण शोध मोहीम १ ते १६ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
कोविड -१९ च्या आपत्कालीन परिस्थितीमुळे क्षय व कुष्ठ रुग्णांचे निदान व उपचार तातडीने करून जास्तीत जास्त रुग्ण शोधून उपचारांवर आणणे व संसर्ग आटोक्यात ठेवणे या संदर्भात आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून रुग्णांच्या लवकर निदानासाठी विविध उपाय योजना सुचविल्या आहेत. रोगशास्त्रीय अभ्यासानुसार क्षय व कुष्ठ आजाराचे रुग्ण निदान व औषधोपचारापासून वंचित राहिल्यास रुग्णाला या रोगापासून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे त्यांच्या सहवासातील इतर लोकांना सुद्धा या आजाराचा धोका संभवतो.
या पार्श्वभूमीवर समाजातील सर्व क्षय व कुष्ठ रुग्णांचा शोध घेऊन औषधोपचार चालू करणे हा अभियानाचा उद्देश आहे. ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण कार्यक्षेत्र व शहरी ३० टक्के अतिजोखीम ग्रस्त ठिकाणी ही मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत आशा स्वयंसेविका व प्रशिक्षित पुरुष स्वयंसेवक त्या- त्या भागातील घरोघरी भेट देवून या आजारांच्या लक्षणांची माहिती देतील. लक्षणांनी ग्रस्त असतील, तर त्यांना पूर्णपणे माहिती देण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. पाटील, कुष्ठरोग विभागाचे सहसंचालक डॉ. रमाकांत पाटील यांनी केले आहे.