शिंदखेड्याच्या उमेदवारीवरून पक्ष निरीक्षकांसमोरच वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 11:33 IST2019-07-25T11:32:39+5:302019-07-25T11:33:42+5:30
राष्टÑवादीतर्फे मुलाखती, अनेक इच्छुकांची होती गर्दी

शिंदखेड्याच्या उमेदवारीवरून पक्ष निरीक्षकांसमोरच वाद
आॅनलाइन लोकमत
धुळे : विधानसभा निवडणुकीसाठी राष्टÑवादी कॉँग्रेसतर्फे बुधवारी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखती दरम्यान शिंदखेडा मतदार संघातून उमेदवारी मागण्यावरून दोन गटात शाब्दीक वाद उफाळून आला. पक्ष निरीक्षकांसमोरच वाद झाल्याने, तो मिटविण्यासाठी राष्टÑवादीच्या पदाधिकाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला. दरम्यान धुळे शहरातून उमेदवारीसाठी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे एकमेव नाव आहे. तर शिंदखेडा मतदार संघासाठी तिघांनी मुलाखती दिल्या.
विधानसभा निवडणुकीसाठी राष्टÑवादी कॉँग्रेसने यापूर्वीच इच्छुक उमेदवारांकडून आॅनलाइन अर्ज मागविले होते. ज्यांनी अर्ज केले होते, त्यांच्या मुलाखती घेण्यासाठी द्विसदस्यीय समिती आज धुळ्यात आली होती. या समितीत प्रदेश कार्यकारिणी सरचिटणीस तथा नंदुरबार जिल्हा प्रभारी उमेश पाटील, धुळे जिल्हा निरीक्षक नाना महाले यांचा समावेश होता. राष्टÑवादी भवनात शिंदखेडा व धुळे शहर मतदार संघासाठी या मुलाखती घेण्यात आल्या. धुळे शहर मतदार संघातून माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे एकमेव नाव आहे. तर शिंदखेडा विधानसभा मतदार संघातून माजी आमदार रामकृष्ण पाटील, संदीप बेडसे, व पंचायत समिती सदस्य ललित वारूड इच्छुक आहेत. दरम्यान ललित वारूडे यांनी उमेदवाराची इच्छा व्यक्त करताच त्यावर मुडावदचे माजी सरपंच सुनील लांडगे व इतर काही जणांनी जोरदार आक्षेप घेतला. शक्तीप्रदर्शनावरूनही बराच वाद झाला. पक्ष निरीक्षकांसमोरच शाब्दीक वाद सुरू झाल्याने, अखेर पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांना हस्तक्षेप करून या वादावर पडदा टाकावा लागला.
यानंतर पक्ष निरीक्षक उमेश पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. एकोप्याने निवडणुकीला समोरे जाण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. यावेळी राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील, अॅड. राजेंद्र पाटील, साहेबराव देसाई, कैलास चौधरी, ज्योती पावरा, इरशाद जहागीरदार, कुणाल पवार, सरोज कदम यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.