विद्यार्थ्यांची काळजी घेत शिक्षण प्रक्रिया सुरू ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 20:59 IST2020-06-17T20:59:18+5:302020-06-17T20:59:46+5:30
विखरण येथे शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची भेट : विद्यार्थी संख्या व बैठक व्यवस्थेचा घेतला आढावा

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन शिक्षण प्रक्रिया सुरु ठेवा अशा सूचना शालेय पोषण आहार अधीक्षक तथा शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश रणदिवे यांनी दिल्या.
शिरपूर तालुक्यातील विखरण येथील साने गुरुजी तांत्रिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश रणदिवे यांनी भेट दिली़त्यावेळी शिक्षकांशी संवाद करतांना ते बोलत होते.
शाळेच्या खोल्या किती? व्यवस्था कशी? सॅनेटराईज व्यवस्था यांचे नियोजन बघून शिक्षकांना मार्गदर्शन केले. इयता ९ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करताना विद्यार्थी संख्या व बैठक व्यवस्था याचा आढावा घेतला. एका वर्गात २० ते २५ या प्रमाणे विद्यार्थी बैठक व्यवस्था करण्यास सांगून शासनाच्या ११ पानांच्या निर्णयाचे वाचन करण्यात आले.
आरोग्य सेतू अॅप सक्तीने डाऊनलोड करण्यास सांगितले. सोशल डिस्टंनचे पालन करणे, हात साबणाने स्वच्छ करणे, पालकांशी संवाद साधा तसेच वेळोवेळी शासनाच्या आदेशांचे पालन करण्याविषयी सूचना दिल्या. लॉकडाऊन कालावधीतही इयत्ता ५ वी च्या वर्गात ८४ अॅडमिशन केल्याबद्दल कौतुक केले. शाळेतील स्वच्छतागृह, ग्रंथालय, जलव्यवस्था, पोषण आहार गृह, शिक्षकदालन, प्रयोगशाळा, आयनॉक्स डिजीटल रुम, कार्यालय याची पाहणी करुन आवश्यक सूचना दिल्या. शाळेच्या आवारात रणदिवे यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी मुख्याध्यापक महेंद्र सनेर यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी केंद्रप्रमुख एम.एस.सुर्यवंशी, पर्यवेक्षक अजय पाटील व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान शिक्षण विभागातर्फे मार्गदर्शन करण्यात येत असले तरी शाळा कधी सुरू होणार याची उत्सुकता आहे.