धुळे : भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनर, ट्रॉला आणि ट्रॅक्टर यांच्यात आपापसात जोरदार धडक बसल्याने अपघात घडला़ यात ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्याने त्यात बसलेले १२ मजूर जखमी झाल्याची घटना धुळे तालुक्यातील आनंदखेडे शिवारातील सुट्रेपाडा फाट्याजवळ रविवारी सकाळी घडली़एनएल ०१ एसी ६३५० क्रमांकाचा कंटेनर भरधाव वेगाने येत असताना नागपूर - सुरत राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील आनंदखेडे शिवारातील सुट्रेपाडा फाट्याजवळ एमएच १८ एएन १६१३ ट्रॅक्टर आणि एमएच १८ झेड ४५९३ क्रमांकाचा ट्रॉला यांच्यात तिहेरी अपघात झाला़ अपघात इतका जबरदस्त होता की दोन्ही वाहनांच्या धडकेमुळे ट्रॅक्टर आणि त्याची ट्रॉली पलटी झाली़ यात बसलेले १२ मजूर फेकले गेल्याने जखमी झाले़ अपघाताची ही घटना ३१ मे रोजी सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास घडली़ या अपघातात निर्मलाबाई मोरे, मिराबाई वेडूदास बैरागी, सुनिता गोपाल अहिरे, पुजा रमेश मोरे, छकुली तुळशिदास बंजारा, सपना चव्हाण, शोभादास जानकीदास बैरागी, जयश्री गजानन पवार, वैशाली रमेश मोरे, सिंधूबाई रमेश मोरे, जमनाबाई राजेंद्र भील आणि ट्रॅक्टर चालक किरण मुरलीधर ल्यास (सर्व रा़ आनंदखेडे ता़ धुळे) यांना दुखापत झाली़ त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़ याप्रकरणी स्वप्निल जानकीदास बैरागी (३४) याने धुळे तालुका पोलीस ठाण्यात पावणे चार वाजता फिर्याद दाखल केली़ पोलीस हेड कॉन्स्टेबल बी़ एम़ रायते घटनेचा तपास करीत आहेत़
कंटेनर, ट्रॉला, ट्रॅक्टरची धडक, १२ मजूर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 21:44 IST