जुन्या नोटा बंदच्या निर्णयाने ग्राहक संभ्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:47 IST2021-02-05T08:47:29+5:302021-02-05T08:47:29+5:30
शहरात गेल्या २ दिवसांपासून यासंबंधी चर्चांना उधाण आले होते़ त्यामुळे आपल्याकडील १००, १० व ५ रुपयांच्या जुन्या नोटा ...

जुन्या नोटा बंदच्या निर्णयाने ग्राहक संभ्रमात
शहरात गेल्या २ दिवसांपासून यासंबंधी चर्चांना उधाण आले होते़ त्यामुळे आपल्याकडील १००, १० व ५ रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत जायन बदलून घेण्यासाठी अनेकांची धावपळ सुरू झाली़
रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाबाबतची सत्यता जाणून घेण्यासाठी अनेकांनी बँक कर्मचाऱ्यांशी तसेच प्रसिद्धी माध्यमांशी संपर्क साधला़ मात्र रिझर्व्ह बँकेच्या लेखी सूचना अद्याप आपल्यापर्यंत पोहोचल्या नसल्याचे बँक यंत्रणेने स्पष्ट केले़ त्यामुळे नागरिकांचा संभ्रम अधिकच वाढला़
तूर्त या तीनही नोटा चलनात आहेत, शिवाय त्या लगेच बंद होण्याचे चित्र नाही़ त्यामुळे नागरिकांनी कसाबसा धीर धरला आहे़ सोमवारी बँका उघडताच नोटा बदलण्यासाठी बँक शाखांमध्ये नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे़ मात्र दोन वर्षापूर्वीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही़
बँकांच्या सुट्यांमुळे
ग्राहकांची अडवणूक
एकीकडे १००, १०, ५ रुपयांच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँक बंद करणार आहे किंवा जुन्या नोटा जमा करून घेणार आहे अशा पद्धतीची चर्चा शहरात सुरू आहे़ तर दुसरीकडे शनिवार व रविवार असे दोन दिवस बँकांची सलग सुटी आल्यामुळे नेमकी माहिती कुठून मिळवावी, अशा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांपुढे निर्माण झाला़ नोटा बदलून घेण्याचा विचार अनेकांच्या मनात आला़ मात्र बँका बंद असल्याने सोमवार उजाडेपर्यंत त्यांना थांबावे लागणार आहे़
बँकांना मात्र अद्यापही काहीच सूचना नाही
या संदर्भात बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला़ मात्र नोटा बदलून देण्याबाबत किंवा जुन्या नोटा बंद करण्याबाबत अद्याप रिझर्व्ह बँकेकडून आपल्याला कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाही असे या सर्वच बँक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले़ मात्र लवकरच सूचना येतील, असेही ते म्हणाले़
व्यापारी म्हणतात,
परिणाम होणार नाही...
नोटा अचानक बंद केल्या तर पूर्वीच्या अनुभवापेक्षाही वाईट परिस्थिती होईल़ मात्र यावेळी रिझर्व्ह बँकेने नोटा परत घेण्याबात खूप आधी पूर्वसूचना दिली आहे़ त्यामुळे ग्राहकांना नोटा बदलून घेण्यासाठी वेळ मिळणार आहे़ एका अर्थाने ही बाब चांगली आहे़ जुन्या खराब नोटा परत घेतल्या जात आहे़ दबून असलेली चिल्लरही बाहेर निघेल़
- दर्शन बाफणा
व्यावसायिक
सध्या बाजारपेठेत १०० रुपयांच्या नवीन नोटा आहेत़ त्यामुळे जुन्या नोटा बँकेने परत घेतल्यास मार्केटवर फारसा परिणाम होणार नाही़ शिवाय शंभर रुपयांच्या नोटांच्या रूपात कुणीच धनसंचय करून ठेवत नाही़ महत्त्वाचे म्हणजे सध्या अनेक व्यवहार ५०० रुपयांच्या नोटांद्वारेच होत आहे़ १० व ५ रुपयांच्या नोटा तर खराब झाल्या आहेत, त्या परत घ्याव्याच़
- विशाल जैन,
व्यावसायिक
१००, १० व ५ रुपयांच्या नोटा परत घेतल्या जाणार काय किंवा ग्राहकांना या नोटा बदलून द्यायच्या काय याबाबत रिझर्व्ह बँकेकडून किवा आमच्या वरिष्ठांकडून आम्हाला अद्याप तरी लेखी स्वरूपात कुठल्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत़ शिवाय शनिवार व रविवार असे सलग २ दिवस बँका बंद आहे़ सध्या तरी या बातम्या केवळ प्रसिद्धिमाध्यमांमध्ये झळकत आहे़ त्यामुळे सोमवारी बँका सुरू झाल्यानंतरच याबाबतची खरी परिस्थिती जाणून घेऊन बोलणे योग्य ठरणार आहे़
- शर्मा, बँक मॅनेजर
जळगाव जनता बँक, शिरपूर