दिव्यांग बांधवांना लॉकडाऊनमध्ये दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 23:03 IST2020-06-21T22:58:21+5:302020-06-21T23:03:05+5:30
समाजकल्याण विभाग : पीठ गिरणी, सायकल, मिरची कांडप यंत्र खरेदीसाठी अर्थसहाय्य बँक खात्यात जमा

दिव्यांग बांधवांना लॉकडाऊनमध्ये दिलासा
धुळे : कोरोनाचा संसर्ग आणि त्याला रोखण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून केलेल्या लॉकडाऊनमध्ये जिल्हा परिषदेने दिव्यांग बांधवांना दिलासा दिला आहे़ पाच टक्के राखीव निधीतून विविध उपयोगी वस्तुंच्या खरेदीसाठी दिव्यांग बांधवांच्या बँक खात्यामध्ये थेट अनुदान जमा करण्यात आले आहे़, अशी माहिती जिल्हा परिषदेतील सूत्रांनी दिली़
दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांना घरगुती उद्योग, व्यवसाय सुरू करण्यास हातभार लागावा म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नातील पाच टक्के निधी दिव्यांग बांधवांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ याआधी केवळ तीन टक्के निधी राखीव ठेवला जात होता़ तो देखील अपेक्षेप्रमाणे दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी खर्च केला जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या़ त्यामुळे केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे राज्य सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाने २५ जून २०१८ रोजीच्या आदेशान्वये सर्व जिल्हा परिषदांना दिव्यांगांसाठी पाच टक्के स्वनिधी राखीव ठेवण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार दरवर्षी पाच टक्के स्वनिधीतून दिव्यांग बांधवांना अर्थसहाय्य केले जात आहे़ विविध वस्तुंच्या खरेदीसाठी शंभर टक्के अनुदान दिले जाते़
मागील आर्थिक वर्षात धुळे जिल्ह्यात दिव्यांग लाभार्थ्यांकडून पाच टक्के राखीव निधीतून वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते़ त्यानुसार पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव छाननीअंती समाजकल्याण विभागाच्या सभापतींच्या परवानगीने पालकमंत्र्यांपुढे मंजूरीसाठी ठेवले होते़ पालकमंत्र्यांच्या मंजुरीनंतर दिव्यांग बांधवांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली होती़ परंतु कोरोनाचा संसर्ग आणि त्यामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे शासकीय कार्यालयातील मनुष्यबळ कमी करण्याचे आदेश प्राप्त झाल्याने दिव्यांग बांधवांना प्रत्यक्ष लाभ देण्याची प्रक्रिया तब्बल तीन महिने लांबली़ दरम्यान, पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये शासनाने शिथीलता दिल्यानंतर आणि शासकीय कामकाज पूर्ववत सुरू करण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने लाभार्थ्यांच्या अंतीम याद्या तयार करुन प्रत्यक्ष बँक खात्यामध्ये अनुदान वर्ग केले़ दिव्यांग बांधवांच्या बँक खात्यात शंभर टक्के अनुदानाची रक्कम जमा झाली आहे़
लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवहार ठप्प असल्याने दिव्यांग बांधवांवर उपासमारीची वेळ आली होती़ परंतु या लाभामुळे त्यांना दिलासा मिळाल्याच्या प्रतिक्रिया आहेत़