भाजपला धक्का देत काँग्रेसने मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:35 IST2021-01-20T04:35:07+5:302021-01-20T04:35:07+5:30
धुळे तालुका तसा पूर्वीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मात्र गेल्या काही वर्षात भाजपत इनकमिंग व इतर पक्षांमध्ये आउटगोईंग जास्त ...

भाजपला धक्का देत काँग्रेसने मारली बाजी
धुळे तालुका तसा पूर्वीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मात्र गेल्या काही वर्षात भाजपत इनकमिंग व इतर पक्षांमध्ये आउटगोईंग जास्त वाढल्याने, त्याचा फायदा भाजपला झालेला दिसून आला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतरही भाजपने जिल्हा परिषद निवडणुकीत घवघवीत यश मिळविले होते. मात्र तो करिष्मा पक्षाला ग्रामपंचायत निवडणुकीत दाखविता आला नाही.
तालुक्यात अनेक ठिकाणी भाजप पुरस्कृत पॅनलची सत्ता ग्रामपंचायतींवर होती. मात्र नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी धक्कादायक निकालाची परंपरा कायम ठेवली. तालुक्यातील नेर, बोरीस, शिरूड या ग्रामपंचायतींकडे सर्वांचे लक्ष लागून होते. यातीनही ठिकाणी भाजपचीच सत्ता होती. मात्र मतदारांनी या तीनही ठिकाणी परिवर्तन घडवून आणले. त्या ठिकाणी काँग्रेस पुरस्कृत पॅनलची सत्ता स्थापन झालेली आहे. कापडण्यातही काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखले आहे.
तसे बघितले गेल्यास या निवडणुकीत भाजप हा एकाकी पडलेला दिसून आला. तर काँग्रेसला मात्र राज्यातील महाविकास आघाडीचा फायदा झाला. काही ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी सोबत असल्याने त्याचा फायदा पक्षाला विजयात झाला. मात्र असे असले तरी भाजपनेही या निवडणुकीत चांगले आव्हान दिले हे विसरता येणार नाही. ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील ७२ पैकी तब्बल ६५ ग्रामपंचायतींवर काँग्रेसने दावा केला आहे. तर यात भाजपही मागे नाही. भाजपने ३५ ग्रामपंचायतींवर दावा केलेला आहे.
या निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते आपला गड राखण्यास यशस्वी होऊ शकले नाही, ही चिंतनाची बाब आहे. उडाणे या गावी पंचायत समितीच्या सभापतीच्या पॅनलला विजय मिळविता आला नाही, तर जिल्हा परिषदेच्या कृषी सभापतींनाही कापडणे गावात जास्त जागा जिंकण्यात यश आलेले नाही. शिरुड गावात गेल्यावेळी भाजपची एकहाती सत्ता होती. मात्र याठिकाणची सत्ता राखण्यात भाजपला यश आलेले नाही.
काँग्रेस पुरस्कृत पॅनलने या निवडणुकीत सरस कामगिरी बजावली असेच या निकालावरून स्पष्ट होते. माजी मंत्री रोहिदास पाटील, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्यावर मतदारांनी पुन्हा एकदा विश्वास टाकत काँग्रेस समर्थक पॅनलला अनेक ठिकाणी सत्तेपर्यंत पोहोचविले आहे.
विशेष म्हणजे या ग्रामपंचायत निवडणुकीत तरुणांनाही मोठ्या प्रमाणावर संधी मतदारांनी दिलेली आहे. आजचा तरुण ‘टेक्नोसेव्ही’ असल्याने, या नवनिर्वाचित तरुण सदस्यांकडून आपल्या गावाचा, वॉर्डाचा जास्तीत जास्त विकास व्हावा, अशी मतदारांची अपेक्षा आहे. या अपेक्षेला ते कितपत खरे ठरतात हे येणाऱ्या काळातच समजणार आहे.