राष्ट्रवादी पक्ष निरीक्षकांसमोर कार्यकर्त्यांचा गोंधळ, प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांची अनुपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 22:15 IST2020-08-09T22:15:24+5:302020-08-09T22:15:48+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस भवन : पक्षाच्या संघटन बांधणीबाबत बंद खोलीत चर्चेची नामुष्की, गट-तटाचे उमटले प्रतिबिंब

राष्ट्रवादी पक्ष निरीक्षकांसमोर कार्यकर्त्यांचा गोंधळ, प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांची अनुपस्थिती
धुळे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भवनात पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत बैठकीपुर्वीच कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला़ पक्ष आम्हाला विश्वासात घेत नाही़ जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्यांना विचारात घेतले जाते असा आरोप केल्याने निरीक्षकांना पदाधिकाऱ्यांशी बंद खोलीत चर्चा करण्याची वेळ आली़ दरम्यान, बैठकीत प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली़
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या संघटन बांधणी संदर्भात बैठक घेण्यात आली. त्यासाठी निरीक्षक तथा सरचिटणीस अविनाश आदिक, अर्जुन टिळे हे शहरात आले होते. बºयाच प्रतिक्षेनंतर निरीक्षक दाखल झाल्यानंतर अनेकांकडून घोषणाबाजीही केली गेली. एकूणच सर्व गोंधळाची स्थिती याठिकाणी दिसून आली. त्यामुळे निरीक्षक अर्जुन टिळे यांनी माईकचा ताबा घेत बैठकीऐवजी आपण बंद दालनात कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेवू, असे स्पष्ट करीत सभागृहातून काढता पाय घेतला. त्यानंतर गटागटांना दालनात बोलवून त्यांच्याशी निरीक्षकांनी चर्चा केली. त्यात सुरूवातील पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी यांना बोलविले गेले. त्यानंतर महिलांना संधी देण्यात आली. दिवसभर गटागटांना दालनात बोलवून निरीक्षकांनी त्यांच्या भावना जाणून घेतल्यात. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये नव्याने केलेल्या नियुक्तीबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. अनेक वर्षापासून पक्षाचे काम करणाऱ्यांना डावण्यात आल्याचा आरोप पदाधिकाºयांनी केला. बराच वेळ गोंधळाची स्थिती कायम होती़ अशातच बैठक उरकण्यात आली़
यावेळी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, रणजित भोसले, किरण पाटील, चंद्रकांत केले, अनिल मुंदडा, एन. सी. पाटील, विनायक शिंदे, पोपटराव सोनवणे, कैलास चौधरी, संदिप बेडसे, सत्यजित सिसोदे, डॉ़ जितेंद्र ठाकूर, रामकृष्ण पाटील, जितू शिरसाठ, रईस काझी, हेमंत मदाने, ज्योती पावरा आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती़
अनिल गोटेंची अनुपस्थिती लक्षवेधी
पक्ष निरीक्षकांच्या समवेत बैठकीत प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली़ यासंदर्भात गोटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, बैठकीत मी जाणार नाही असे सर्व वरिष्ठांना मी यापुर्वीच सांगितले होते़ जेणे करुन वाद होणार नाही आणि कार्यकर्त्यांना मनमोकळे बोलता येईल, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केली़
राष्ट्रवादी भवनात झालेल्या पक्ष निरीक्षकांच्या बैठकीत कोणत्याही प्रकारचा गोंधळ झालेला नाही़ - किरण शिंदे, जिल्हाध्यक्ष