सात कोविड सेंटरवरील परिस्थिती समाधानकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 22:01 IST2020-06-13T22:00:55+5:302020-06-13T22:01:32+5:30
जिल्हा : जळगाव जिल्ह्यातील घटनेनंतर जिल्ह्यात सर्वच कोविड सेंटरवरील सर्तकतेत वाढ

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात एकूण सात कोविड केअर सेंटर कार्यरत आहेत. त्यात धुळे, शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यात दोन, शिरपूर तालुक्यात एक कोविड केअर सेंटर सुरु आहेत. तर शिरपूर व दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात कोविड हेल्थ केअर सेंटर सुरु आहेत. रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था मानव विकास मिशन कडे सोपवण्यात आली आहे. सध्या धाडणे ता.साक्री येथे आठ, शिंगावे ता.शिरपूर येथे ५ आणि शिंदखेडा येथे १५ असे एकूण २८ रुग्ण दाखल आहेत. जळगाव येथील घटनेनंतर सर्वच ठिकाणी आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच कोविड सेंटरवर समाधानकारक परिस्थिती दिसून आली.
धुळे तालुका - धुळे शहरातील नगाव बारी परिसरात असलेले कोविड केअर सेंटर आहे. याठिकाणी धुळे तालुक्यातील रूग्णांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येते. तालुक्यातील ज्या रूग्णांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविले जातात किंवा बाधीत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या संभाव्य कोरोना पॉझीटीव्ह रूग्णाला बाफना रूग्णालयात संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येते. ६१ खाटांची रूग्णालयाची क्षमता आहे. आतापर्यंत तालुक्यातील १०० रूग्णांना येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. रूग्णांच्या जेवणाची व्यवस्था 'मानव विकास मिशन अंतर्गत करण्यात आली आहे. त्यासाठी नियमानुसार ई टेंडरींग केले आहे. दोन वेळेस चहा, वरण भात, पोळी- भाजी आदि जेवण त्यांच्याकडून देण्यात येते अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी तरन्नूम पटेल यांनी दिली.
दोन रूग्ण कोरोनामुक्त - बाफना मेमोरीयल रूग्णालयात उपचार घेऊन दोन रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत एकही रूग्ण रूग्णालयात दाखल नाही.
शिरपूर तालुका - तालुक्यातील शिंगावे येथील आदिवासी मुलींचे वसतीगृहात कोवीड-१९ संस्थात्मक विलगीकरण कक्ष अद्यावत असून तेथे आतापर्यंत १३७ रूग्णांवर उपचार करण्यात आले आहेत़ शिंगावे येथील आदिवासी मुलींचे वसतीगृहात कोवीड-१९ संस्थात्मक विलगीकरण कक्ष अद्यावत करून १७ एप्रिलपासून कार्यान्वीत करण्यात आले आहे़ सदर संस्थात्मक विलगीकरण कक्षात परिचारीका कक्ष, वैद्यकीय कक्ष, क्वारंटाईन कक्ष हे ४८ खोल्यांमध्ये पलंग गादी, फॅन, हवेशीर अशा स्वरूपाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत़ शिंगावे ग्रामपंचायतकडून रोज सॅनेटायझिंगद्वारे फवारणी केली जात आहे़ तसेच खोल्या देखील स्वच्छ केल्या जात आहेत़
आतापावेतो या कोविड सेंटरला १३७ रूग्णांवर उपचार करण्यात आले आहेत़ १२ रोजी देखील ५ कोरोना बाधित व त्यांच्या संपर्कात आलेले ७ असे १२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत़ कोरोना बाधित रूग्णांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या रूग्णांना याठिकाणी ठेवले जाते़ रूग्णांना दोन वेळचे पॅक कंटेनर डब्यात जेवन पुरविले जाते़ तसेच चहा दिला जातो़
विशेषत: बाधित वा संसर्गीत रूग्णांना दिले जाणारे बेड पुन्हा लगेच दुसऱ्या रूग्णांना दिले जात नाही़ बाधित रूग्ण डिस्चार्ज झाल्यानंतर ते बेड सॅनिटायझरने फवारणी केल्यानंतर पुर्न वापरण्यात येते़ प्रत्येक रूग्णांना सध्यातरी वेगवेगळ्या खोलीत ठेवण्यात आले आहे़ त्यामुळे अशा रूग्णांचा एकमेकांमध्ये संपर्क होत नाही़
लौकी येथील आश्रमशाळेत क्वारंटाईन कक्ष उभारण्यात आला असून तेथे देखील १२५ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे़ याशिवाय येथील रुग्णांना अधिक उपचारासाठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये पाठविण्यात येते.
शिंदखेडा तालुका - येथे एसएसव्हीपीएस महाविद्यालय समोरील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात कोविड सेंटर कार्यरत आहे. आतापर्यंत याठिकाणी १११ रुग्णांवर उपचार करण्यात आले. आता सेंटरवर पाच संदिग्ध रुग्णांवर उपचार सुरु आहे.
शुक्रवारी येथील सेंटरला उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल,यांच्या सोबत तहसीलदार साहेबराव सोनवणे, अप्पर तहसीलदार सुदाम महाजन ,तालुका वाद्यकीय अधिकारी डॉ भूषण मोरे यांनी भेट देऊन सेंटरची पाहणी केली. सेंटरवर दिवसा दोन डॉक्टरसह चार परिचर, एक औषध निर्माता आणि प्रशासक प्रमुख विजय गिरासे, आरोग्य विस्तार अधिकारी आर.बी. सोनवणे असे १२जण सकाळी आणि रात्री उपस्थित असतात.
येथील रुग्णांना सकाळी चहा नाश्ता पोहे, उपमा व मठ उसळ देण्यात येते. दुपारी व रात्री जेवणात डाळ, भात चपाती व भाजी दिली जाते. सेंटरला दिवसभरातून तहसीलदार, अप्पर तहसीलदार, व पोलिसनिरीक्षक दुर्गेश तिवारी वेळोवेळी भेट देत असल्याचे रुग्णांनी सांगितले.
पिंपळनेर- येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना कोविड सेंटर उभारण्यात आले असून या ठिकाणी अँटिबायोटिक, एक्स-रे व रक्त तपासणी करून रुग्णाला विलगीकरण कक्षात ठेवण्यात येते व त्यानंतर धुळे येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येथे अशी माहिती वैदयकीय अधिकारी डॉ.राकेश मोहने यांनी दिली.
पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला असून या कक्षात आतापर्यंत आठ ते दहा व्यक्तींना प्राथमिक तपासणी करून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यात काहींचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. तर येथील ग्रामीण रुग्णालयात एखाद्या नागरिकाला सिमटम्स दिसून आल्यानंतर त्या रुग्णाची प्राथमिक तपासणी यात एक्स-रे व रक्त तपासणी करण्यात येते त्यात काही लक्षणे आढळून आल्यास त्या त्वरित १०८ रुग्णवाहिका येणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात येते.
या रुग्णालयात करुणा संसर्गजन्य लक्षणे आढळलेला रुग्ण अद्याप तरी मिळून आलेला नाही. संशयीत रुग्णाला औषधे देऊन त्यास आराम करण्यासाठी सांगतो. तसेच त्या रुग्णाचा फोन नंबर पत्ता घेऊन रुग्णाचा संपर्क करण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहने यांनी‘लोकमत’ला दिली.
यासाठी रुग्णांसाठी स्वतंत्र बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.े रुग्णांवर याठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचाराठी तातडीने धुळे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येते. आता पर्यंत या रुग्णालयाच्या माध्यमातून ३ हजार ३७० रुग्णांची तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती डॉ.मोहने यांनी दिली.
दोंडाईचा - दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना उपचारासाठी दाखल केले जाते. उपजिल्हा रुग्णालयाच्या मानाने रुग्ण संख्या आज तरी कमी आल्याने या कोविड सेंटरला कोरोनाग्रस्त रुग्णासाठी केलेल्या सुविधा समाधानकारक दिसल्या. यासंदर्भात याठिकाणी उपचार घेतल असलेल्या रुग्णांनी पण ‘लोकमत’शी बोलतांना याबाबत समाधान व्यक्त केला.
दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णासाठी कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. रुग्णालयात कोविड व नॉन कोविड असे विभाग करण्यात आले आहेत. आज पर्यंत रुग्णालयात ११ कोविड पॉझिटिव्ह रुग्ण होते. शुक्रवारी दोन जणांची सुटी करण्यात आली असून आता नऊ कोरोना बाधित रुग्ण उपचार करीत आहेत. कोरोना बाधित रुग्णांना सकाळी ८ वाजता चहा, साडे आठ वाजता पोहे नाश्ता दुपारी साडे अकरा ते साडे बारा वाजे दरम्यान जेवन ,पुन्हा साडे चार वाजता चहा व सायंकाळी साडे सहा ते सात चा दरम्यान जेवन देत असल्याचे सांगण्यात आले.रुग्णांनी देखील समाधान व्यक्त केले.