‘फास्ट टॅग’ची सक्ती, दोन दिवसात २ हजार २८९ वाहनांकडून दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:07 IST2021-02-18T05:07:43+5:302021-02-18T05:07:43+5:30
मशीनमधील तांत्रिक अडचणी -टोल नाक्यावर फास्ट टॅगमुळे वाहन लवकर सोडली जातील, असे सांगितले जात असले तरी अनेकदा तांत्रिक अडचणीमुळे ...

‘फास्ट टॅग’ची सक्ती, दोन दिवसात २ हजार २८९ वाहनांकडून दंड वसूल
मशीनमधील तांत्रिक अडचणी -टोल नाक्यावर फास्ट टॅगमुळे वाहन लवकर सोडली जातील, असे सांगितले जात असले तरी अनेकदा तांत्रिक अडचणीमुळे जोपर्यंत गाडीची एंट्री होत नाही, तोपर्यंत गाडी सोडली जात नसल्याने मागील गाड्या खोळंबून रहात आहे. त्यामुळे अवघ्या काही मिनिटातच गाड्यांच्या रांगा लागत आहे. त्यामुळे वेटिंगमध्ये असलेल्या वाहनांचे चालक हे यंत्रणेबाबत नाराजी व्यक्त करतांना दिसले. आधी यंत्रणा अपडेट करावी त्यानंतरही सक्ती करावी, असे वाहन चालकांचे म्हणणे होते.
वाहन मालकांचे वाद - दरम्यान, दंड वसुली ही डबलची होत असल्याने फास्ट टॅग न लावलेले काही वाहन मालक हे अचानक असे कसे होऊ शकते. यंदा सोडा यापुढे लक्षात ठेऊ, असे सांगत टोलवरील कर्मचाऱ्यांशी वाद घालतांना दिसले. पण शासनाचा आदेश आणि सीसीटीव्हीत रेकाॅर्ड होत असल्याने दंड भरल्याशिवाय गाड्या सोडल्या जात नव्हत्या.
फास्ट टॅग बसविण्याची धावपळ - काही गाडी मालकांनी दंड भरण्याऐवजी फास्ट टॅग बसविण्यासाठी धावपळ करतांना दिसले. टोल नाक्यावर फास्ट टॅग बसविण्याची सोय असल्यामुळे गाड्या साईडला लावल्यानेही टोलवर गाड्यांची गर्दी दिसून आली. दिवसभर ही धावपळ दिसून आली.
फास्ट टॅग रिचार्जसाठी रांग - काही गाड्यांना फास्ट टॅग बसविलेले होते. परंतु त्याचा रिचार्ज संपलेला असल्याने विनाकारण दंड भरण्याऐवजी फास्ट टॅग रिचार्ज करण्यासाठी टोल नाक्यावर उघडण्यात आलेल्या खिडकीवर गाडी मालक व चालकांची रांग लागलेली दिसली.
केंद्र शासनाच्या आदेशानुसार आमच्या टोलवर १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीनंतर फास्ट टॅग न लावलेल्या गाड्यांकडून कायद्यानुसार रीतसर डबल दंड वसूल केला जात आहे. गाडीला फास्ट टॅग बसविण्याची आणि रिचार्ज करण्याची सोय टोलवर करण्यात आली आहे. नवीन सोय असल्याने सुरुवातीला सर्वांनाच याचा तोडा त्रास होत आहे. परंतु तरीही आमच्या टोलवर अवघ्या काही मिनिटातच फास्ट टॅग लावलेल्या गाड्या लगेच सोडल्या जात आहे.
-कृष्णकांत शर्मा, आयएसपीपीएल टोल कंपनी, धुळे
फास्ट टॅग बसविला आहे. ही पद्धत चांगली आहे. यामुळे अनेक गोष्टींना आळा बसणार आहे. तसेच भ्रष्टाचारही होणार नाही. केंद्र शासनाच्या निर्णयाचे स्वागत करतो.
— राहुल भास्करराव पाटील, (वाहन मालक),
फास्ट टॅग सिस्टिम चांगली आहे. परंतु तिची सक्ती करण्याआधी त्याबाबत जनजागृती तसेच त्यासंदर्भात टोल नाक्यावर येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर केल्या पाहिजे होत्या.
- विनोद रामसिंग सिसोदिया (वाहन मालक)
आधी टोल भरणारे रांगेत तर टोल न भरणारे ऐटीत सरळ निघून जायचे. आता फास्ट टॅग बसविल्याने सर्वांना समान वागणूक मिळेल. तसेच टोल बुडविणाऱ्यावर अंकुश बसेल.
- योगेश छगन माळी (वाहन मालक)