शिरपूरात संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 12:14 IST2020-03-22T12:14:31+5:302020-03-22T12:14:59+5:30
काळजी घेणाऱ्यांची संख्या नगण्य । शासकीय कार्यालयांमध्ये गर्दी कमी

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : कोरोना विषाणू संसर्गांचा फैलाव अथवा शिरकाव तालुक्यात, जिल्ह्यात होवू नये, यासाठी प्रशासनासोबतच आता नागरीकही काही प्रमाणात काळजी घेवू लागले आहेत़ मात्र त्यांची संख्या अत्यंत नगण्यच राहिली आहे़ शनिवारी शहरात ठिकठिकाणी पाहणी केली असता, संमिश्र चित्र दिसले़
शासकीय कार्यालयांत गर्दीला बºयापैकी ओहोटी दिसली़ मात्र अन्य सार्वजनिक ठिकाणची गर्दी अजूनही ओसरलेली दिसत नाही़ विशेष म्हणजे स्वत:ची कोणतीही काळजी न घेता हे नागरीक घोळक्याने गप्पा मारतांना, हस्तांदोलन करतांना, सºर्हास रस्त्यावरच थुंकतांना आढळून आलेत़
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन नगरपालिका व आरोग्य विभागाकडून सातत्याने करण्यात येत आहे़ राज्यातील रूग्णांची संख्या एकीकडे वाढत चालली असतांना आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना व उपाय योजनांबाबत सर्वांनीच खबरदारी घेणे आवश्यक आहे़ मात्र प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही़
जिल्ह्यात आजवर एकही बाधित किंवा संशयित रूग्ण आढळलेला नाही़ मात्र, यामुळे बेफिकीर राहणे परवडणारे नाही, अशाच पध्दतीने प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत़ प्रचंड सतर्कता या आजाराच्या अनुषंगाने बाळगली जात असतांनाही बहुतांश नागरीक मात्र अजूनही याविषयी गंभीर झालेले दिसत नाहीत़
शासकीय कार्यालये, बसस्थानक, रूग्णालय, बाजारपेठेत पाहणी केली असता संमिश्र चित्र पहायला मिळाले़ शासकीय कार्यालयांमध्ये नागरीकांची वर्दळ कमी झालेली दिसून आली़ तर दुसरीकडे रूग्णालय, बसस्थानक, किराणा दुकानांमध्ये वर्दळ कायम असून त्यातील नागरीकांकडून पुरेशी खबरदारी घेतली जात नसल्याचे आढळून आले़