दिलासादायक.. जिल्ह्यातील कोरोनाचा ग्राफ घसरतोय, गत आठवड्यात ७९१ नवे रुग्ण,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:37 IST2021-05-18T04:37:15+5:302021-05-18T04:37:15+5:30
धुळे : मागील काही दिवसांत जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे सतत वर जाणारा कोरोनाचा आलेख खाली ...

दिलासादायक.. जिल्ह्यातील कोरोनाचा ग्राफ घसरतोय, गत आठवड्यात ७९१ नवे रुग्ण,
धुळे : मागील काही दिवसांत जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे सतत वर जाणारा कोरोनाचा आलेख खाली आला आहे. दैनंदिन बाधित रुग्णांच्या संख्येत आठवडाभरात घसरण झाली आहे. दि. १० ते १६ मे या कालावधीत ७९१ नवे रुग्ण आढळून आले, तर १ हजार ६६१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
मार्चनंतर जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या अचानक वाढली होती. दररोज ५०० च्या वर रुग्ण आढळत होते. मात्र मागील आठवड्यात दैनंदिन बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
१९६ पेक्षा अधिक रुग्ण आढळले नाहीत -
१० ते १६ मे या कालावधीत दैनंदिन बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सातत्याने ४०० ते ५०० रुग्ण दररोज आढळत होते. मात्र गत आठवड्यात एका दिवसात सर्वाधिक १९६ रुग्ण आढळले आहेत. १० मे रोजी १९६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर मात्र बाधित रुग्णांची संख्या आणखी कमी झाली. ११ मे रोजी १८६ अहवाल पॉझिटिव्ह आले होते. १२ रोजी १०२, १३ रोजी १२७, १४ रोजी ४० तर १६ मे रोजी केवळ ३५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याउलट बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ११ मे रोजी ६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. तर इतर सर्व दिवशी २०० पेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
सक्रिय रुग्णांची संख्याही घटली -
दैनंदिन बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने सक्रिय रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सक्रिय रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. ४ हजारांपेक्षा अधिक सक्रिय रुग्ण जिल्ह्यात होते. मात्र सध्या सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन १ हजार ४२१ इतकी झाली आहे. धुळे शहरात सध्या ५३२ सक्रिय रुग्ण आहेत. दुसऱ्या लाट ग्रामीण भागात अधिक तीव्र असल्याने प्रत्येक तालुक्यात १ हजारापेक्षा अधिक सक्रिय रुग्ण झाले होते. मात्र सध्या प्रत्येक तालुक्यातील ३०० पेक्षा कमी रुग्णांवर उपचार सुरू आहेत. धुळे तालुक्यात २९० सक्रिय रुग्ण आहेत. शिरपूर तालुक्यातील १९४, शिंदखेडा १५६, तर साक्री तालुक्यातील २४९ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.
तज्ज्ञ म्हणतात...
बेसावध राहू नका...
- कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसत आहे. कदाचित हा लॉकडाऊनचा परिणाम असू शकतो. त्यामुळे प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. रुग्णांनी दुखणे अंगावर काढू नये. लक्षणे दिसल्यानंतर तत्काळ उपचार केल्यास मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते. तसेच कोरोनामुक्त झाल्यानंतर म्युकरमायकोसिससारखा आजार होऊ नये, यासाठीही काळजी घ्यावी.
- डॉ.विशाल पाटील, जिल्हा कोरोना नोडल अधिकारी
मागील काही दिवसांत दिवसभरात लागणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे. महाविद्यालयात दाखल रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. मात्र लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या अजूनही कमी झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी बेसावध राहू नये. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. शारीरिक अंतर ठेवावे.
- डॉ. दीपक शेजवळ, नोडल अधिकारी, हिरे वैद्यकीय महाविद्यालय
दैनंदिन बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे; पण आढळत असलेल्या अनेक रुग्णांना तीव्र स्वरूपाची लक्षणे दिसत आहेत. तसेच कोरोनामुक्त झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मधुमेहाची औषधे सुरू ठेवावी. नाक, कान, डोके दुखत असेल, डोळ्यातून पाणी येत असेल तर तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. निर्मलकुमार रवंदळे, प्रमुख, औषध वैद्यकशास्त्र विभाग, हिरे महाविद्यालय
ग्राफ साठी
१० मे
पॉझिटिव्ह - १९६
बरे झालेले - २३८
११ मे
पॉझिटिव्ह - १८६
बरे झालेले - ६५
१२ मे
पॉझिटिव्ह - १०२
बरे झालेले - ३७५
१३ मे
पॉझिटिव्ह - १२७
बरे झालेले - २३२
१४ मे
पॉझिटिव्ह - ४०
बरे झालेले - २७५
१५ मे
पॉझिटिव्ह - १०५
बरे झालेले - २४२
१६ मे
पॉझिटिव्ह - ३५
बरे झालेले - २३४