थंडीने पुन्हा जनजीवनावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 11:48 IST2020-02-01T11:48:04+5:302020-02-01T11:48:51+5:30
आरोग्यावर परिणाम : बदलत्या हवामानाने रुग्णांमध्ये वाढ; तापमान ६.६ अंशावर घसरले

Dhule
धुळे : मागील महिन्यात तापमानाचा पारा ५ अंशापर्यंत उतरला होता. हि स्थिती बरेच दिवस राहिल्यानंतर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील चार पाच दिवसात तापमानात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये गती आली. परंतु आता दोन दिवसापासून परत तापमान कमी झाल्याने पुन्हा जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी पहाटे शहराच्या तापमानाचा पारा ६.६ अंशापर्यंत घसरल्याने गारठा वाढला. शुक्रवारी पहाटेपासून वेगाने वाहणारे थंड वारे दुपारपर्यंत वाहत असल्यामुळे दिवसभर नागरिकांना थंडीची तीव्रता जाणवली.
नव्या वर्षातील पहिल्या आठड्यापासून तापमानाचा पारा कमी झालेला दिसून आला़ या हंगामात आतापर्यंत तापमान मागील महिन्यात ११ तारखेला पारा ५ अंशापर्यंत पोहचल्याने धुळेकर गारठले होते. दिवसभर गरम कपडे घालूनच नागरिक घराबाहेर निघतांना दिसत होते. त्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात काहीअंशी तापमानाचा पारा वाढल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र दोन दिवसात अचानक ६.६ अंशावर वाढलेल्या थंडीने गरम कपड्यांची पुन्हा गरज निर्माण झाली. तापमानात होणाऱ्या या बदलाने त्याचा परिणाम आरोग्यावर दिसून येत आहे. विशेष: नवजात शिशूंच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यांच्यावर कोणत्याही विषाणूंसह जंतूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. त्याचा परिणामही बाल रुग्णांवर दिसू लागला आहे़ बालरोग तज्ज्ञांकडे येणाºया रुग्णांमध्ये एक वर्षाआतील बाल रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.
सध्या असलेल्या हवामानामुळे २० टक्क्याने या सर्वच आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. बदलत्या हवामानामुळे विशेषत: जुना अस्थमा असलेल्यांना त्रास वाढला आहे. त्यांना डोस वाढवून घेण्याची वेळ आली आहे. या वातावरणाचा सामान्यांनाही त्रास होत आहे. काहींमध्ये अस्थमाच्या सुरुवातीची लक्षणे दिसून येत आहेत. थंडीपासून बचाव व नियमित औषधे हाच यावर उपाय असल्याचे देखील तज्ज्ञ डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.