दुर्लक्षित पानखेडा गढीवर स्वच्छता, संवर्धन मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 12:22 IST2020-02-10T12:22:27+5:302020-02-10T12:22:57+5:30
पिंपळनेर : ‘आपला वारसा, आपण जपूया’ उपक्रम, शिवदुर्ग व दुर्गवीर प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळनेर : साक्री तालुक्यात अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गढी असून, दुर्लक्षामुळे त्यांची दुरवस्था झालेली असली तरी आजही त्या अस्तित्व टिकवून आहेत. यापैकीच एक असणाºया पानखेडा ता.साक्री येथील पुरातन गढीची स्वच्छता व संवर्धन मोहीम नुकतीच राबविण्यात आली. या मोहिमेत सटाणा (जि.नाशिक) येथील दुर्गवीर प्रतिष्ठानचे पदाधिकारी, साक्री येथील शिवदुर्ग प्रतिष्ठानचे पदाधिकारी, तसेच आ.मा.पाटील व दीपरत्न विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी आदि सहभागी झाले होते.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका ऐतिहासिक वास्तूंनी भरलेला आहे. असे एक गाव नाही जेथे ऐतिहासिक वास्तू नाहीत. ६ व्या शतकापासून पिंपळनेरचे अनेक उल्लेख विविध ताम्रपट व कागदपत्रात येतात. तालुक्यात अभिर, राष्ट्रकूट, यादव घराण्यांच्या वेगवेगळ्या कालखंडात समृध्द राजवट नांदल्या आहेत. पुढे मोघलांकडून हा संपूर्ण प्रदेश स्वराज्यात आला आहे. साक्री तालुक्यात महाराष्ट्रातील सर्वधिक गढया देखील आहेत. त्यातीलच एक गढी पिंपळनेर पासून ४ किमी अंतरावर पानखेडा येथील एका डोंगरावर आहे.
‘आपला वारसा आपण जपूया’ या मोहिमेअंतर्गत पानखेडा गढीची नुकतीच स्वच्छता व संवर्धन मोहीम करण्यात आली.
यात बुरूज व तटबंदीवरील काटेरी साबर, झुडपे काढण्यात आली. आतील गृहांची देखील साफसफाई करण्यात आली. एका बुरूजावर भगवा ध्वज लावण्यात आला. ज्या गढीने शेकडो वर्षांचा इतिहास अनुभवला, परकीय आक्रमण अंगावर झेलून तत्कालीन गावकऱ्यांचे रक्षण केले ती गढी गेली कित्येक दशके काटेरी साबरीच्या विळख्यात अडकलेली होती. या मोहिमेच्या निमित्ताने ती मोकळा श्वास घेत होती. छत्रपती शिवरायांच्या विचाराने प्रेरित होऊन ह्या ऐतिहासिक गढीची साफसफाई करण्याच्या मोहिमेत पानखेडा येथील दीपरत्न माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या उत्साहाने कार्य करत होत्या. सदर गढीही किमान ६०० वर्षे तरी जुनी असावी, असे लक्षात येते. या संवर्धन मोहिमेत पिंपळनेर येथील कर्मवीर आ.मा. पाटील विद्यालयाचे शिक्षक व शिवदुर्ग प्रतिष्ठानचे सदस्य जयेश खैरणार व त्यांचे विद्यार्थी, पानखेडा येथील दीपरत्न माध्यमिक विद्यालयातील सचिन देशमुख व त्यांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच सटाणा येथील दुर्गवीर प्रतिष्ठानचे रोहित जाधव व नितिन अहिरे सहभागी झाले होते.