कुमार नगरात नागरिक डेंग्यूने धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:32 IST2021-07-26T04:32:56+5:302021-07-26T04:32:56+5:30
धुळे : कोरोना महामारीनंतर आता महानगरात डेंग्यूने ताेंड वर केले आहे. शहरातील विविध भागात आतापर्यंत ६८ रुग्ण आढळून आले ...

कुमार नगरात नागरिक डेंग्यूने धास्तावले
धुळे : कोरोना महामारीनंतर आता महानगरात डेंग्यूने ताेंड वर केले आहे. शहरातील विविध भागात आतापर्यंत ६८ रुग्ण आढळून आले आहेत. मनपाकडून धुरळणी व फवारणी नियमित होत नसल्याने नागिरकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. साक्रीरोडवरील कुमारनगर भागात दाेन नागरिकांचा आतापर्यंत डेंग्यू आजाराने मृत्यू झाला आहे.
साक्रीरोडवरील कुमार नगर परिसरात डेंग्यू आजार डोके वर काढत आहे. परिसरात खड्डे असल्याने पावसाचे पाणी डबक्यात साचते. त्या भागातील पाण्याचा निचरा होण्याची नितांत गरज असताना पाण्याचा निचरा होत नाही. तर महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी गटार साफ करण्यासाठी येतात. मात्र, नागरिकांकडून पैशांची मागणी होते. त्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढल्याने डेंग्यूची साथ वाढत आहे. मनपाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी प्रशांत तनेजा यांनी केली आहे.
खासगी रुग्णालयात उपचार
शहरात महिन्याभरापासून डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. वातावणातील बदलामुळे डेंग्यू पसरविण्याऱ्या एडिस इजिप्ती डासांचा उद्रेक वाढल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी काही जणांचे अहवाल डेंग्यूचे आढळून आले आहे. शासकीय रुग्णालयापेक्षा खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेणााऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
अंगदुखी व ताप
कोरोना व डेंग्यू या दोन्ही आजारांमध्ये ताप जास्त प्रमाणात येतो. तसेच अंगदुखीचा त्रास होतो. कोरोनामध्ये सर्दी व खोकल्याचे प्रमाण अधिक असते. डेंग्यूमध्ये मात्र सर्दी, खोकला होत नाही. झालाच तर प्रमाण कमी असते. डेंग्यूमध्ये डोळे दुखतात. कोरोनाच्या काही रुग्णांमध्येही अशी लक्षणे आढळली आहेत. डेंग्यू या आजारात सांधेदुखीचा तीव्र त्रास जाणवतो.
पाणी उकळून प्या
पावसाळ्यात दूषित पाण्याचे प्रमाण वाढत असते. त्यामुळे आजार बळावतात. म्हणून पाणी उकळूनच प्यावे. जिल्ह्यातील जलस्रोतांची आरोग्य विभागाने तपासणी केली होती. त्यात १३ गावांतील पाणी दूषित असल्याचे स्पष्ट झाले होते. पाणी उकळून प्यावे. त्यामुळे डायरिया, गॅस्ट्रो याप्रकारचे त्रास होत नाहीत.
कोरडा दिवस पाळा
पावसाळ्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत असते. तसेच विषाणूतच बदल होतो. विषाणूंचा बदल रोखणे आपल्या हातात नाही. पण परिसर स्वच्छ ठेवल्यास डासांची उत्पत्ती आपण रोखू शकतो. गच्चीवरील टायर, भंगार वस्तू यात पाणी साठू देऊ नये. आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा.
- डॉ. अनिल पाटील,
जिल्हा हिवताप अधिकारी