नागरिकांनी घाबरू नये..मात्र सतर्क रहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 12:45 IST2020-03-21T12:44:48+5:302020-03-21T12:45:11+5:30
दोंडाईचा नगरपालिका : विषाणूंचा संसर्ग व प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजनेबाबत सूचना

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : कोरोना या विषाणूने सर्वत्र धुमाकूळ घातलेला आहे. या आजाराबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये.मात्र सतर्क रहावे असा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर माजी मंत्री व आमदार जयकुमार रावल यांच्या सूचनेनुसार कोरोनाचा प्रादुर्भाव टाळणे व खबरदारी उपाययोजने बाबत दोंडाईचा पालिकेत बैठकीचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा नयनकुवर रावल होत्या.
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.ललीत चंद्रे यांनी यावेळी मार्गदर्शनात सांगितले की, कोरोना विषाणूबाबत नागरीकांनी घाबरुन न जाता सतर्क रहावे. दिवसभरात वारंवार हात साबणाने, हँड वॉश, सॅनिटायझरने स्वच्छ धुवावेत. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे. शक्यतोवर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. खोकतांना तोंडावर रुमाल ठेवावा, सार्वजनिक ठिकाणी थंकू नये, आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
दोंडाईचा पालिका मुख्याधिकारी डॉ.दीपक सांवत यांनी सांगितले की, कोरोनोचा संसर्ग होऊ नये म्हणून शासनाच्या आदेशानुसार ३१ मार्चपावेतो गुरुवारचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार आहे.नागरिकांनी गरजेनुसार जिवनाश्यक वस्तू घ्याव्यात. जीवनावश्यक वस्तूचा साठा करु नये. नगरपालिकेच्या माध्यमातून सामाजिक संघटनांना, नागरिकांना सतर्क करण्यात येईल, जनजागृती केली जाईल.
भाजप शहर अध्यक्ष प्रविण महाजन यांनी शहरातील सर्व सामाजिक संघटनांनी नगरपालिकेच्या भावनिक आवाहनास सकारात्मक पाठिंबा दिला असल्याचे सांगून कोरोनाविषयी कोणीही गैरसमज पसरवू नये. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरुन जाऊ नये. शक्यतो प्रवास टाळावा. शिक्षणानिमित्त बाहेर गावी असलेल्या विद्यार्थ्यांनी नियमित तपासणी करुन घेण्याचे आवाहन केले.
कोरोनाच्या माध्यमाने आलेल्या जागतिक आपत्तीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजनांमुळे भारतातील परिस्थिती इतर देशांच्या तुलनेने नियंत्रणात असल्याचे हस्ती बँकेचे अध्यक्ष कैलास जैन यांनी सांगितले. आमदार रावल यांनी दोंडाईचासह तालुक्यातील जनतेला कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारीचे आवाहन केले.
बैठकीस उपनगराध्यक्ष रवींद्र उपाध्ये, मुख्याधिकारी डॉ.दीपक सांवत, भाजपा शहराध्यक्ष प्रविण महाजन, आरोग्य सभापती जितेंद्र्र गिरासे, माजी आरोग्य सभापती कृष्णा नगराळे, नगरसेवक खलील बागवान, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.ललित चंद्रे, हस्ती बँकेचे चेअरमन कैलास जैन, रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष डॉ.सचिन पारख, रोटरीचे डॉ.बी.एल. जैन, खुर्शीद कादीयानी, लायन्सचे अध्यक्ष राकेश अग्रवाल, संजय अग्रवाल, जैन सोशल ग्रुपचे रवींद्र कोटडीया, दिनेश कर्नावट, विनित सोलंकी, जायन्टसचे चंद्र्रकांत जाधव, सुनिल शिंदे, जामा मस्जिद ट्रस्टचे, गरीब नवाज वेल्फेअर संस्थेचे सदस्य, बागवान समाजाचे सदस्यांसह हाजी बागवान, उपमुख्यधिकारी हर्षल भामरे, आरोग्य निरीक्षक शरद महाजन, पाणीपुरवठा अभियंता प्रकाश जावरे आदी उपस्थित होते.