विधी सेवा प्राधिकरणाचा नागरिकांनी लाभ घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 18:49 IST2019-11-12T18:49:25+5:302019-11-12T18:49:47+5:30
कायदेविषयक पंधरवड्याच्या उदघटनाप्रसंगी न्या. मंगला धोटे यांचे प्रतिपादन

विधी सेवा प्राधिकरणाचा नागरिकांनी लाभ घ्यावा
आॅनलाइन लोकमत
धुळे : न्यायालयात खटला दाखल करण्यापूर्वी जास्तीत जास्त नागरिकांनी विधी सेवा प्राधिकरणाच्या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी येथे केले.
पोलीस प्रशिक्षण केंद्रात कायदेविषयक पंधरवाड्याच्या उदघटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पोलीस अधीक्षक तथा पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य प्रशांत बच्छाव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या.जहीर शेख, सह दिवाणी न्यायाधीश डॉ. डी.यू. डोंगरे, विधीज्ञ आर. आर. निकुंभ, सी.एम. भंडारी, पोलीस निरीक्षक जगन्नाथ गायकवाड उपस्थित होते.
न्या. धोटे यांनी सांगितले की, ४९८, ३०७ या कलमांसाठी दाखल होणाऱ्या प्रकरणांची पोलिसांनी अगोदर चौकशी करूनच गुन्हे दाखल करावेत. त्यांनी जिल्हा विधी सेवेच्या कार्याबद्दल गौरोदगार काढले.
न्या.डोंगरे म्हणाले, आम्ही फक्त न्यायदान करीत नाही तर कायदेविषयक जनजागृतीही करीत असतो. लोकअदालतीमध्ये अनेक प्रकरणे निकाली काढले जातात. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. अॅड. भंडारी यांनी सायबर गुन्ह्यासंदर्भात मार्गदर्शन केले.