वीज तारा हटविण्यासाठी नागरिकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:23 IST2019-11-20T23:22:28+5:302019-11-20T23:23:06+5:30
घरांवर उच्च दाबाच्या धोकेदायक वीजतारा : ग्रा.पं.ने दिले वीज विभागाला पत्र; मात्र कारवाई नाही

Dhule
दत्तवायपूर : शिंदखेडा तालुक्यातील बाभळे येथील आदिवासी भागात ३३ केव्ही वीजेच्या तारा लोकवस्तीतून नागरिकांच्या घरावरून गेलेल्या आहेत. त्या अत्यंत धोकादायक आहेत. यापूर्वी या तारेला स्पर्श झाल्याने दोन ते तीनजण जखमी झाले होते. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनातर्फे महावितरण विभागाचे उपअभियंता यांना पत्र देण्यात आले आहे. मात्र महावितरण विभाग दुर्लक्ष करीत आहेत. आठ दिवसाच्या आत वीज तारा हटविण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांनी आंदोलन करुन केली आहे.
बाभळे गावातील आदिवासी वसाहतीत घरावरून वीजतारा लोंबकळत असल्याने घराच्या छतापासून दीड ते दोन फुटावर आहेत. तापी पाणी पुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या वीजतारा ३३ केव्ही असल्याने वस्तीतून काढून गावाबाहेरुन अभय कोटॅक कंपनीच्या बाजूने घेण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामपंचायतीने महावितरण नरडाणा विभागीय अधिकाऱ्यांना पत्र व्यवहारद्वारे केली आहे. मात्र या मागणीला केराची टोपली दाखवली आहे.
महावितरण विभागाकडून याबाबत कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नसल्याने गावकºयांनी नाराजी व्यक्त केली. गावातील या भागात सर्व स्तरातील लोकवस्ती आहे. यापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी दोन व्यक्ती वीजतारांच्या धक्क्याने जखमी झाले होते.
या परीसरात इंदिरा आवास, शबरी माता आवास, रमाई आवास योजनेंतर्गत घरे बांधण्यात आली आहेत. गावाची लोकसंख्येच्या मानाने घरांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे येथील वीजतारा दिवसेंदिवस अडचणी निर्माण करणारे असून धोकेदायक ठरत आहेत.
परीसरात वेगवेगळ्या भागात विजेच्या तारा लोंबकळतांना दिसतात. या पार्श्वभूमीवर महावितरण विभागाच्या अधिकाºयांनी वीजतारा वस्तीतून हटवाव्यात, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.
यावेळी सरपंच ज्ञानेश्वर पाटील, उपसरपंच भरत पाटील, कैलास भिल, महादू भिल, भगवान भिल, पवन भिल, आनंदा भिल, राजू मोरे, अर्जुन भिल, युवराज भिल, सुरेखाबाई भिल, गिरजाबाई भिल, लताबाई भिल, शांताबाई भिल, गुंताबाई भिल, हिराबाई भिल, तसेच ग्रामस्थांतर्फे आंदोलन करुन मागणी करण्यात आली आहे.